नुकताच वर्षातील पहिला सण मकर संक्रांत सर्वत्र साजरा झाला. मकर संक्रांतीनिमित्त अनेक नवविवाहित जोडपी काळे कपडे आणि हलव्याचे दागिने परिधान करून हा सण साजरा करतात. यंदा १४ जानेवारीला मकर संक्रांत होती. अशात अजूनही अनेक नवीन जोडपी हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा करीत आहेत. यंदा सिनेविश्वातील अनेक कलाकारांनीही त्यांची पहिली मकर संक्रांत साजरी केली आहे. अशात ‘प्रेमाची गोष्ट’मधील अभिनेत्री स्वरदा ठिगळेने नुकतेच तिच्या पहिल्या मकर संक्रांतीचे फोटो शेअर केलेत.

मराठी मालिका विश्वातील ‘प्रेमाची गोष्ट’ ही एक प्रसिद्ध मालिका आहे. या मालिकेनं फार कमी काळात प्रेक्षकांच्या मनात आपली छाप उमटवली आहे. त्यातील सर्वच कलाकार आपली भूमिका चोख बजावताना दिसत आहेत. या मालिकेत मुक्ता हे प्रमुख पात्र अभिनेत्री तेजश्री प्रधान साकारत होती. काही दिवसांपूर्वी तिने या मालिकेतून एक्झिट घेतली. त्यामुळे आता तिच्या जागी मुक्ताच्या भूमिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे दिसत आहे. स्वरदानं फार कमी काळात मुक्ता या पात्राद्वारे पसंती मिळवली आहे.

आपल्या पहिल्या मकर संक्रांतीचे फोटो तिनं सोशल मीडियावर पोस्ट केलेत. त्यामध्ये ती पती सिद्धार्थसह सुंदर पोज देताना दिसत आहे. दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे सुंदर दागिने घातले आहेत. फोटो शेअर करीत स्वरदाने यावर एक पोस्टही लिहिली आहे. “पारंपरिक हलव्याचे दागिने, समृद्धी, प्रेम व नवीन सुरुवात यांचे प्रतीक असलेली आमची पहिली मकर संक्रांत आम्ही एकत्र साजरी करीत आहोत. हा सुंदर विधी सूर्याचे मकर राशीतील संक्रमण दर्शवतो आणि आपल्या जीवनात सकारात्मकता व विपुलता आणतो. नवविवाहित जोडप्याप्रमाणे हे दागिने घालणं आणि हा सण साजरा करणं हे आपल्याला आपल्या मुळाशी, संस्कृतीशी आणि एकमेकांशी जोडणारं आहे. आज उंच उंच उडणाऱ्या पतंगांप्रमाणे आमचा प्रवास उज्ज्वल होवो!”

आईने बनवले हलव्याचे दागिने

स्वरदाच्या आईनं तिच्यासाठी हे हलव्याचे दागिने बनवले आहेत. तिनं पोस्टमध्ये पुढे आईचेही आभार मानलेत. “माझ्यासाठी आणि सिद्धार्थसाठी हे सुंदर ‘हलव्याचे दागिने’ बनवल्याबद्दल आई तुला धन्यवाद! मला तुझ्यासारखं व्हायचं आहे. आतापर्यंत मी तुझ्याकडून खूप काही शिकले आणि आशा आहे की, एक दिवस मी नक्की तुझ्यासारखी होईन.”

स्वरदाने गेल्या वर्षी २०२४ मध्ये जानेवारी महिन्यात सिद्धार्थ राऊतबरोबर साखरपुडा उरकला. त्यानंतर मार्च महिन्यात या दोघांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. “सिद्धार्थनं नेहमी माझी साथ दिल्याबद्दल त्याची मी आभारी आहे”, असंही तिनं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

स्वरदाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. त्यानंतर ‘सावित्री देवी कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल’, ‘प्यार के पापड’, ‘नागिन ५’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ अशा मालिकांमध्ये तिनं कामं केली आहेत. सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत ती मुक्ता हे पात्र साकारत आहे.

Story img Loader