Premachi Goshta Fame Apurva Nemlekar : ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या एक्झिटमुळे चर्चेत आहे. या मालिकेत ती मुक्ता कोळी हे पात्र साकारत होती. तेजश्रीने मालिकेतून एक्झिट घेतल्यावर आता मुक्ताच्या भूमिकेसाठी अभिनेत्री स्वरदा ठिगळेची वर्णी लागली आहे. १७ जानेवारीपासून प्रेक्षकांना मालिकेत नवीन मुक्ता पाहायला मिळणार आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका साधारण दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. याशिवाय मालिकेला टीआरपी सुद्धा चांगला आहे. त्यामुळे तेजश्रीच्या एक्झिटच्या बातमीनंतर तिचे काही चाहते प्रचंड नाराज झाले होते. आता मुक्ताच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री स्वरदा ठिगळे दिसेल. जवळपास दीड वर्षांनी एखाद्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेऊन मुख्य भूमिका करणं हे कोणत्याही कलाकारासाठी कठीण असतं. मात्र, सेटवर सगळ्यांचा खूप चांगला पाठिंबा मिळत असल्याचं अभिनेत्रीने नुकतंच माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
मालिकेत नव्याने आलेल्या मुक्तासाठी ‘प्रेमाची गोष्ट’ची खलनायिका सावनीने खास पोस्ट शेअर केली आहे. सावनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लिहिते, “स्वरदाबरोबर काम करणं हे नेहमीच आनंददायी असतं. आम्ही याआधी सुद्धा एकत्र काम केलेलं आहे. तेव्हा सुद्धा एकत्र काम करताना खूप चांगला अनुभव आला होता. तिच्यामध्ये प्रचंड टॅलेंट आहे, कलाकार म्हणून प्रोफेशनल असणं, सेटवरचा वावर आणि ऊर्जा हे सगळंच तिचं खूप छान असतं. आम्हाला पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळतेय त्यामुळे मी आनंदी आहे. मला माहिती आहे की, ती ही भूमिका उत्तमपणे साकारेल याशिवाय या प्रोजेक्टमुळे तिच्या आयुष्यात नक्कीच चांगल्या गोष्टी घडतील. तुझ्याबरोबर काम करण्यास मी खरंच उत्सुक आहे.”
दरम्यान, अपूर्वा नेमळेकर आणि स्वरदा ठिगळे यांनी यापूर्वी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. यामध्ये स्वरदाने मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय २०१३-१५ या कालावधीत सुरू असलेल्या ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेत सुद्धा स्वरदाने महत्त्वाची भूमिका साकारली होती.