‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका जितकी चर्चेत असते, तितकेच त्यामधील कलाकारांचीदेखील चर्चा असते. या मालिकेतील मुक्ता, सागर, सई, सावनी, मिहीर, मिहिका, इंद्रा, कोमल, आदित्य या पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका आतापर्यंत तीन कलाकारांनी सोडली. यापैकी एक कलाकार आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजश्री प्रधानने अचानक ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केला. त्यामुळे प्रेक्षकांना धक्काच बसला. तेजश्रीने अचानक मालिका का सोडली? असा प्रश्न निर्माण झाला. पण अजूनपर्यंत याबाबत तेजश्रीने मौनं धारणं केलं आहे. तेजश्रीच्या जागी आता स्वरदा ठिगळे मुक्ताच्या भूमिकेत दिसत आहे. तेजश्रीच्या आधी हर्षवर्धन अधिकारी ही भूमिका साकारणारा अभिनेता यश प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडली होती. आता हर्षवर्धनच्या भूमिकेत अनिरुद्ध हरीप पाहायला मिळत आहे.
तसंच सर्वात आधी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका मृणाली शिर्केने अचानक सोडली होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यात मिहिकाच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता बने झळकली. मृणालीनेदेखील मालिका सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलेलं नाही. पण हीच मृणाली शिर्के आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. लोकप्रिय हिंदी मालिकेत मृणाल शिर्केची वर्णी लागली आहे.
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेचा आता नवा अध्याय सुरू झाला आहे. त्यामुळे मालिकेत नवीन स्टार कास्ट झळकली आहे. या नव्या स्टार कास्टमध्ये मृणाली पाहायला मिळत आहे.
‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेत मृणाली शिर्के जुही या भूमिकेत झळकणार आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या मालिकेत मृणालीसह काही मराठी चेहरे पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री मीरा सारांग, विनायक भावे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारली आहे.
दरम्यान, मृणालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेपूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं होतं. ‘मेरे साई’, ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकांमध्ये मृणालीने काम केलं आहे. तसंच ती ‘हरिओम’ या चित्रपटात झळकली होती.