Premachi Goshta : ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे, यामध्ये मुक्ता कोळी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वीच या मालिकेतून एक्झिट घेतली. छोट्या पडद्यावर तेजश्रीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आजवर तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे तेजश्रीने मालिका सोडल्यावर तिचे अनेक चाहते नाराज झाले होते. आता तेजश्रीच्या ऐवजी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
मुक्ता कोळी हे पात्र मालिकेत आता स्वरदा ठिगळे साकारत आहे. लग्नानंतर या अभिनेत्रीने मालिकाविश्वात पुनरागमन केलं आहे. तसेच मुक्ताची रिप्लेसमेंट भूमिका स्वीकारण्यावर ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत स्वरदाने भाष्य केलं आहे.
स्वरदा सांगते, “मला लग्न झाल्यावर पुन्हा कामाकडे वळायचं होतं. यासाठी काही ऑडिशन्स सुद्धा दिल्या होत्या. आता छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना एका चांगल्या मालिकेशी मी जोडले गेले याचा खूप आनंद आहे. मालिकेतली मुख्य भूमिका भावल्यामुळे आणि ही भूमिका आव्हानात्मक असल्याने मी मुक्ता कोळीच्या भूमिकेसाठी लगेच होकार कळवला. तेजश्री प्रधानने ही भूमिका उत्तम साकारली होती, त्यामुळे मी तिच्या जागी दिसणार म्हटल्यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. पण, माझ्यासाठी हेच आव्हान आहे. आता या व्यक्तिरेखेला मला माझ्या नजरेतून उभं करायचं आहे. वाहिनीचे बिझनेस हेड सतीश राजवाडे, मालिकेची संपूर्ण टीम यांना मी या भूमिकेसाठी योग्य वाटले ही बाब खरंच सुखावणारी आहे.”
तसेच स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेनंतर प्रेमाची गोष्टच्या निमित्ताने काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याची संधी मिळाली असंही स्वरदा ठिगळेने सांगितलं आहे.
यापूर्वी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत स्वरदा ठिगळे म्हणाली होती, “आईची भूमिका मी पहिल्यांदाच ऑनस्क्रीनवर साकारतेय त्यामुळे नक्कीच धाकधूक आहे. पडद्यावर आईची भूमिक साकारणं ही मोठी गोष्ट आहे…मी याकडे एक चॅलेंज म्हणूनच बघतेय. स्टार प्रवाहने माझ्यावर विश्वास टाकला यासाठी मी त्यांची खूप जास्त आभारी आहे. नवीन वर्ष, नवीन शो आणि त्यात माझी खऱ्या आयुष्यात सुद्धा ही पहिलीच संक्रांत आहे. त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय. मुक्ताची सासू असो किंवा माझी खरी सासू सगळेच माझी संक्रांत साजरी करण्यासाठी उत्सुक आहेत.”