छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती पुरस्कारांच्या रुपात मिळावी याकरता दरवर्षी अवॉर्ड शो आयोजित केले जातात. गेल्या काही दिवसांपासून ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. वाहिनीच्या एकूण १४ मालिकांमधले कलाकार या सोहळ्यात एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. हा सोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला असून, याचं प्रेक्षपण प्रेक्षकांसाठी येत्या १६ मार्चला करण्यात येणार आहे.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात आपल्या आवडत्या मालिकांमधल्या कलाकारांना नेमके कोणते पुरस्कार मिळालेत याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे. अशातच सोहळ्याचं प्रक्षेपण होण्याआधीच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या स्वरदा ठिगळेने ट्रॉफीसह फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिला प्रदान करण्यात आलेल्या ट्रॉफीवर स्वरदाने कोणता पुरस्कार जिंकलाय याचं नाव स्पष्टपणे दिसत आहे.

स्वरदा ठिगळेने मुक्ताच्या रुपात ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत जानेवारी महिन्यात एन्ट्री घेतली होती. तेजश्रीने अचानक मालिका सोडल्यावर मुक्ताच्या भूमिकेसाठी स्वरदाची वर्णी लागली आहे. आता नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात स्वरदाला ‘सर्वोत्कृष्ट पत्नी’चा पुरस्कार मिळाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

ट्रॉफी आणि चॉकलेटसह फोटो शेअर करत स्वरदा लिहिते, “आपल्या स्टाफकडून जेव्हा कौतुकाची थाप मिळते चॉकलेटच्या रुपात, तेव्हा आयुष्यात जिंकल्याचा आनंद द्विगुणित होतो. थँक्यू यू.” या पोस्टमध्ये स्वरदाने तिच्या मेकअप आर्टिस्टला टॅग करत तिचे आभार मानले आहेत.

swarda
‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्री स्वरदा ठिगळेची पोस्ट ( Star Pravah Parivaar Awards 2025 )

दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ ( Star Pravah ) वाहिनीवर यंदा पुरस्काराच्या शर्यतीत ‘साधी माणसं’, ‘मुरांबा’, ‘शुभविवाह’, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’, ‘उदे गं अंबे’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ठरलं तर मग!’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’, ‘येड लागलं प्रेमाचं’, ‘तू ही रे माझा मितवा’ आणि ‘अबोली’ अशा एकूण १४ मालिका असणार आहेत. आता या मालिकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.