Premachi Goshta Serial: वसंत ऋतूची चाहूल लागताच साजरा होणाऱ्या सणांपैकी एक म्हणजे होळी. देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा केला जातो. ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने होळी प्रज्वलित केली जाते. यालाच शिमगा असंदेखील म्हणतात. यंदा १३ मार्चला होळी सण मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केला गेला. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सागर-मुक्ताने म्हणजे अभिनेता राज हंचनाळे आणि स्वरदा ठिगळेने माहीम कोळीवाड्यात यंदाची होळी साजरी केली. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गेल्या वर्षी सागर-मुक्ताने लग्नानंतरची पहिली होळी साजरी केली होती. पण तेव्हा सागर, सई आणि आदित्यला एकत्र आणण्यासाठी मुक्ता दुरावली होती. सागरच्या सुखासाठी मुक्ताने त्याच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. यंदा सागर-मुक्ता एकत्र माहीम कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करताना दिसले. यावेळी दोघांच्या सोबतीला सईदेखील होतील.
‘स्टार प्रवाह’ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सागर-मुक्ता पूजा-अर्चा करून रिती-रिवाजानुसार होळी साजरी करताना दिसत आहेत. एवढंच नव्हेतर सागर, मुक्ता आणि सई कोळी बांधवांबरोबर कोळी गाण्यांवर थिरकताना पाहायला मिळत आहेत. यासाठी मुक्ता, सईने खास कोळी पेहराव केला होता. मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगळेने गुलाबी रंगाची साडी कोळी पद्धतीने नेसली होती. तसंच सईनेदेखील मुक्ताप्रमाणेच लाल रंगाची साडी नेसून कोळी पेहराव केला होता. मायलेकी पारंपरिक पेहरावात खूप सुंदर दिसत होत्या. सागर म्हणजे अभिनेता राज हंचनाळेने पिवळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि त्यावर टोपी असा सुंदर लूक केला होता. माहीम कोळीवाड्यातील सागर, मुक्ता आणि सईचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आले आहेत. हे व्हिडीओ पाहून सावनी कुठे आहे? आदित्य कुठे आहे? असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत.
सध्या मालिकेत काय सुरू आहे?
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या सावनीकडे सईची कस्टडी आहे. त्यामुळे सावनी सईला मॉडेल करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सावनीसाठी सईचं शिक्षण नव्हे तर मॉडेलिंग महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे सईला सावनीच्या जाळ्यात अडकू न देण्यासाठी मुक्ता केअरटेकर म्हणून सावनीच्या घरी काम करत आहे. यासाठी मुक्ताने म्हाताऱ्या बाईचं रुप घेतलं आहे. लवकरच सईला म्हाताऱ्या बाईच्या रुपात मुक्ता आई असल्याची जाणीव होणार आहे.