सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अभिनेत्री रेश्मा शिंदे, किरण गायकवाड , शाल्व किंजवडेकर यांच्यानंतर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने गुपचूप लग्न केल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्याचे लग्नाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मिहीर म्हणजे अभिनेता राजस सुळेने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या चैत्राली पितळेशी राजसने लग्न केलं आहे. मराठी मालिकाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी राजस आणि चैत्रालीच्या लग्नाला खास हजेरी लावली होती.
राजस सुळे आणि चैत्राली पितळेचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. लग्नात राजसने राजेशाही पेहराव केला होता. ऑफ व्हाइट रंगाचा आउटफिट घातला होता; ज्यावर सोनेरी रंगाचा फेटा घातला होता. तसंच चैत्रालीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. राजस आणि चैत्राली राजेशाही लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते.
हेही वाचा – गौतमी पाटीलची आता छोट्या पडद्यावर जबरदस्त एन्ट्री, ‘या’ लोकप्रिय कार्यक्रमात पाहायला मिळणार
दरम्यान, गेल्या वर्षी अभिनेता राजस सुळेने प्रेमाची कबुली दिली होती. ‘हंच मीडिया’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना राजस म्हणाला होता की, गेल्या आठ वर्षांपासून मी रिलेशनशिपमध्ये आहे. यावेळी त्याने प्रेयसीबरोबर फोटो देखील दाखवला. त्यामुळे उपस्थित असलेले इतर कलाकार त्याला म्हणाले की, तू खूप जणीचं हृदय तोडलं आहेस.
राजस सुळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला आहे. त्याने साकारलेली मिहीरची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आधी अभिनेता ‘हर हर महादेव’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याने सदाची भूमिका साकारली होती. तसंच त्याने ‘एबीपी माझा’ वाहिनीवरील ‘मन सुद्ध तुझं’ या कार्यक्रमात काम केलं होतं.