‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट’. ही मालिका दीड वर्षापासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करीत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. तसेच मुक्ता, सागर, सई, सावनी, इंद्रा, कोमल, स्वाती, मिहीर अशा मालिकेतील सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांना मनात एक वेगळं घर निर्माण केलं आहे. नुकताच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगळेच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. स्वरदानं लग्नाचा पहिला वाढदिवस गोव्यामध्ये पतीबरोबर साजरा केला. त्याचे फोटो तिने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दोन महिन्यांपूर्वी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत स्वरदा ठिगळेची एन्ट्री झाली. मालिकेतील मुक्ताची भूमिका साकारणाऱ्या तेजश्री प्रधानची जागा स्वरदाने घेतली. सुरुवातीला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. मात्र, आता प्रेक्षकांनी स्वरदाला मुक्ता म्हणून स्वीकारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. स्वरदाने त्याच ताकदीने मुक्ताची भूमिका पेलली आहे. गेल्या वर्षी २७ मार्चला स्वरदा लग्नबंधनात अडकली. जानेवारी २०२४ मध्ये मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाल्यानंतर दोन महिन्यांनी स्वरदानं सिद्धार्थ राऊतशी लग्नगाठ बांधली. पारंपरिक पद्धतीनं स्वरदा व सिद्धार्थचं लग्न झालं होतं. काल २७ मार्चला दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. हा खास दिवस दोघांनी एकत्र साजरा केला.
लग्नाचा पहिला वाढदिवस स्वरदा ठिगळेनं पती सिद्धार्थबरोबर गोव्यात साजरा केला. त्याचे फोटो स्वरदानं इन्स्टाग्राम शेअर केले आहेत, ज्यामध्ये स्वरदा पतीबरोबर डेट करताना दिसत आहे. तसेच ती लाल रंगाच्या बिकिनी आउटफिटमध्ये खूप सुंदर असल्याचं पाहायला मिळत आहे. गोव्यातील स्वरदा व सिद्धार्थच्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्वरदाचा नवरा हा इंटेरियर डिझायनर आहे.
दरम्यान, स्वरदा ठिगळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं २०१३ साली ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर ती हिंदी मालिकेतही झळकली. तिनं ‘सावित्री देवी कॉलेज’ या हिंदी मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर तिनं ‘प्यार के पापड’ या मालिकेतही काम केलं. या दोन हिंदी मालिकांनंतर ती पुन्हा मराठी मालिकेत झळकली. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत तिनं ताराराणी यांची भूमिका उत्तमरीत्या साकारली. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला होता. आता स्वरदा मुक्ताच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहे.