‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या एका कारणामुळे खूप चर्चेत आली आहे, ते म्हणजे तेजश्री प्रधान. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानने मुक्ता ही भूमिका साकारली होती. पण काही दिवसांपूर्वी तेजश्रीने मालिका सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे सूर पसरले आहेत. तेजश्रीच्या अचानक एक्झिटमुळे अनेक प्रश्नदेखील उपस्थित झाले आहेत. पण, याबाबत तेजश्रीने अद्याप मौन धारण केल्याचं पाहायला मिळत आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगळेने घेतली आहे. स्वरदा आता मुक्ताच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनी म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने स्वरदासाठी खास पोस्ट शेअर केली होती. शिवाय यानिमित्ताने दोघी सेलिब्रेशनदेखील करताना दिसल्या. पण दुसऱ्या बाजूला तेजश्री आणि अपूर्वाच्या मैत्रीत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. तेजश्रीचं मालिका सोडण्यामागचं कनेक्शन अपूर्वाशी असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा – हळद लागली! ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याच्या हळदीचे फोटो आले समोर, पाहा
तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर दोघींनी सोशल मीडियावर एकमेकींना अनफॉल केलं आहे. तसंच गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दोघी दुबई ट्रिपला गेल्या होत्या. याचे फोटोसुद्धा डिलीट केले आहेत. त्यामुळे सध्या तेजश्रीने अचानक मालिका सोडण्यामागचं कनेक्शन अपूर्वा आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात ‘मराठी सीरियल’ या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेनंतर तेजश्री प्रधानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिची ही पोस्ट खूप व्हायरल झाली होती. तेजश्रीने या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, चिअर्स…काही वेळेला बाहेर पडणं गरजेचं असतं. तुमची कुवत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा. कारण हे तुमच्यासाठी कोणीही करणार नाही. पण, आता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेनंतर तेजश्री कोणत्या नवीन भूमिकेत झळकणार? याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी
‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सुरुवातीपासून टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेनंतर सर्वाधिक टीआरपी असलेली मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ आहे. गेल्या आठवड्यात ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी रेटिंग ५.७ होता. पण तेजश्रीच्या एक्झिटनंतर या टीआरपीवर काही परिणाम होणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.