‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा लोकप्रिय कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’चं दुसरं पर्व २१ ऑक्टोबरपासून सुरू झालं आहे. या दुसऱ्या पर्वातील पहिल्याच भागात ‘स्टार प्रवाह’वरील दोन लोकप्रिय मालिकांमध्ये सांगितिक लढत पाहायला मिळाली. ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील कलाकार या सांगितिक स्पर्धेत सहभागी झाली होते. यावेळी सांगितिक लढतसह अंतरंगी टास्क घंटाघरामधील मज्जा असं सर्व काही पाहायला मिळालं. शिवाय अर्जुन सायलीला प्रपोज करताना दिसला, तर मुक्ता आपल्या आईची नक्कल करताना पाहायला मिळाली. याचा व्हिडीओ स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’मध्ये खलनायिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला नातेवाईक मारतात टोमणे; तिच्या आईला थेट फोन करून सांगतात…
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ‘आता होऊ दे धिंगाणा’चं पहिलं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं होतं. हे पहिलं वहिलं पर्व चांगलंच लोकप्रिय ठरलं. या पहिल्या पर्वातील साडे माडे शिंतोडे, बोबडी वळाली, धुऊन टाक, रेखाटा पटा पटा या फेऱ्या सुपरहिट ठरल्या. त्यामुळे दुसऱ्या पर्वातही या फेऱ्या पाहायला मिळाल्या. यावेळी ‘प्रेमाची गोष्ट’ मधील मुक्ता म्हणजेच तेजश्री प्रधानमधील एक वेगळी कला पाहायला मिळाली. तिने अभिनेत्री शुभांगी गोखले यांची जबरदस्त नक्कल केली; याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
तेजश्रीमधील ही एक वेगळी कला पाहून तिचे चाहते या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. “खूप छान”, “शुभांगी गोखलेचं बोलत आहेत असंच वाटतं होतं. खूपचं छान तेजू”, “सेम टू सेम”, “लय भारी” अशा प्रतिक्रिया तेजश्रीच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा – “त्यांचे आई-वडील आमच्यासारखे म्हातारे होण्याआधीच वरती…” ऐश्वर्या नारकर यांचं ट्रोलर्सना उत्तर, म्हणाल्या…
दरम्यान, ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पुढच्या भागात ‘मन धागा धागा जोडते नवा’ आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील कलाकार सहभागी होणार आहेत. आता या दोन मालिकांमध्ये कोण ही सांगितिक लढत जिंकत? हे येत्या काळात समजेल.