ज्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात, तो सण म्हणजे गणेशोत्सव. अवघ्या काही दिवसांनी घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे. लवकरच सर्वजण बाप्पाच्या भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघतील. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘स्टार प्रवाह’वर ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता हा सोहळा पाहता येणार आहे. बाप्पाच्या गोष्टींचा खजिना या कार्यक्रमातून उलगडला जाणार आहे. या कार्यक्रमातील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधानचा जबरदस्त उखाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
यंदा ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ या सोहळ्यांचं सूत्रसंचालन अभिनेत्री निर्मिती सावंत व अभिनेता पुष्कर श्रोत्री करणार आहेत. गेल्यावर्षी देखील या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी निर्मिती सावंत यांनी सांभाळली होती. पण सोबतीला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर होता. महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी या सोहळ्यात ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. यंदा देखील दोन नव्या मालिकांची घोषणा होणार आहे. या नव्या मालिकांमध्ये जुने लोकप्रिय चेहेरे पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर, कश्मिरा कुलकर्णी असे तगडे कलाकार मंडळी नव्या मालिकेत झळकणार आहेत. तर दुसऱ्या नव्या मालिकेत अभिनेता अभिजित आमकर, अभिनेत्री शर्वरी जोग पाहायला मिळणार आहेत. अशातच मुक्ताच्या म्हणजे तेजश्री प्रधानच्या उखाण्याच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
हेही वाचा – Video : आदित्य आणि पारू देणार प्रीतमच्या प्रेमाला साथ पण…; नेमकं काय घडणार? पाहा नवा प्रोमो
तेजश्री प्रधानचा भन्नाट उखाणा ऐकून निर्मिती सावंत म्हणाल्या…
तेजश्रीच्या उखाण्याचा व्हिडीओ ‘स्टार सीरियल मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तेजश्री भन्नाट उखाणा घेत म्हणते, “पाण्यात ताज ताज म्हावरं, ये सावने मावशे बघतेस ना सागरचं मांज्यावर प्रेम हाय केवढं” तेजश्रीचा हा जबरदस्त उखाणा ऐकून सर्व कलाकार टाळ्यांचा वर्षाव करतात. त्यावर निर्मिती सावंत पुष्करला विचारतात, “सागर पतंग उडवतो?” पुष्कर म्हणतो, “नाय” यावर निर्मिती सावंत विनोद करत म्हणतात, “मग मांज्यावर प्रेम कसं काय?” यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकतो.
हेही वाचा – Video: “आर्या जळतेय…” निक्की तांबोळी व अरबाज पटेलचं ‘ते’ कृत्य पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, १ सप्टेंबरला ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा महाएपिसोड रंगणार आहे. या महाएपिसोडमध्ये मुक्ता सावनीचा डाव उधळून लावणार आहे. दुपारी ३ वाजता आणि संध्याकाळी ५ वाजता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा महाएपिसोड पाहता येणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd