‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट’. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. पण, या मालिकेत काही महिन्यांपूर्वी मोठा बदल झाला, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली. जी अजूनही कायम दिसत आहे. जानेवारी महिन्यांत ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ताची भूमिका साकारणाऱ्या तेजश्री प्रधानची एक्झिट झाली. अचानक झालेल्या तेजश्रीच्या एक्झिटमुळे चाहत्यांना धक्काच बसला. पण, तेजश्रीने मालिका सोडली असली तरी मालिकेतील काही कलाकारांबरोबर तिचं असलेलं नातं कायम आहे. हे नुकत्याच झालेल्या भेटीतून दिसून आलं.
२० मार्चला तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील कलाकारांबरोबर ग्रेट भेट झाली. याचे फोटो ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचे दिग्दर्शक विघ्नेश कांबळे आणि तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. योगेश केळकर ( पुरुषोत्तम कोळी ), आयुष भिडे ( लकी ), कोमल सोमारे ( स्वाती ) आणि दिग्दर्शक विघ्नेश कांबळे आणि तेजश्री अशा पाच जणांची ग्रेट भेट झाली. यानिमित्ताने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ताचे वडील पुरुषोत्तम कोळी म्हणजे अभिनेते योगेश केळकर यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.
भेटीचे फोटो शेअर करत योगेश केळकर यांनी लिहिलं, “काही वेळेस ‘व्यावसायिक’ नात्यांमधून असे बंध जुळले जातात की अगदी आयुष्यभर जपून ठेवले जातात. मालिकेच्या निमित्ताने एकत्र आलेले ‘आम्ही’ पण आता असेच सोबत असू. कामं होत राहतील, आयुष्यात चढ-उतार देखील होत राहतील, पण ही ‘सोबत’ अशीच कायम राहो हीच त्या ‘नटेश्वरा’ चरणी प्रार्थना. राजस, उमेश दादा, अमृता…पुढच्यावेळी तुम्ही पण असायलाच हवे सोबत…यावेळी तुम्हाला माफ केलं.”
योगेश केळकर यांच्या पोस्टवर तेजश्री प्रधानने प्रतिक्रिया देत लिहिलं, “कायम.” तसंच अमृता बनेनं लिहिलं की, बक्ष देदो सरकार…येस काम होतं राहिल. पण ही सोबत अविरत असो. याशिवाय चाहत्यांनी योगेश यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेवर मोठा परिणाम झालेला दिसला. तेजश्रीने सोडल्यानंतर मालिकेच्या टीआरपीत मोठी घसरण झाली. टीआरपीच्या यादीत दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर असणारी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका थेट पाचव्या स्थानावर गेलेली पाहायला मिळाली. तसंच काही दिवसांनी मालिकेची वेळ बदलण्यात आली. प्राइम टाइम असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या ६.३० वाजता प्रसारित होतं आहे.