Premachi Goshta Marathi Serial : ‘स्टार प्रवाह’वरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नुकताच नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला आहे. यावेळी कोळी कुटुंबातील मुक्ता, सागर, सई व आदित्य यांनी खास नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने कोळी पेहराव केला. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील कलाकारांच्या पारंपरिक कपड्यांमधील फोटोंना सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. याच पार्श्वभूमीवर आता इंद्रा कोळी आणि सई यांनी केलेली रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मालिकेतील इंद्रा आणि सई म्हणजेच अभिनेत्री संजीवनी जाधव आणि इरा यांच्या ‘सण आयलाय गो नारली पुनवेचा’ या कोळी गीतावरील धमाल रीलला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही रील पोस्ट करण्यात आली आहे. नारंगी रंगाची साडी आणि त्यावर पांढऱ्या रंगाची ओढणी परिधान केलेल्या छोट्याशा सईची निरागसता पाहून, नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील आजी आणि नातीचे हे गोड हळवे नाते कॅमेऱ्याच्या मागेदेखील प्रेक्षकांना पहायला मिळत आहे. या रीलमध्ये अभिनेत्री संजीवनी जाधव यांनी हिरव्या व गुलाबी रंगाची साडी आणि कपाळावर भलंमोठं कुंकू, हिरव्या बांगड्या व पारंपरिक दागिने, असा पेहराव केला आहे. त्यांच्या या डान्सला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.
हेही वाचा : लोकप्रिय गायक जस्टिन बीबर झाला बाबा, बाळाचा फोटो शेअर करून जाहीर केलं नाव
‘असा’ झाला रक्षाबंधनाचा कार्यक्रम
नुकताच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत रक्षाबंधनाचा सण साजरा केला गेला आहे. या रक्षाबंधनाच्या निमित्ताने सागरने त्याची बहीण स्वातीच्या पुढील भविष्यासाठी तिच्या हक्काचे घर तिला ओवाळणीत गिफ्ट केले. त्याचबरोबर आदित्यला पहिल्यांदाच सागरबरोबर हा सण साजरा करता आला म्हणून तो खूपच आनंदी दिसत होता. कालच्या भागात मिहिरने सावनीऐवजी मुक्ताला मोठ्या बहिणीचा मान देत, तिच्याकडून राखी बांधून घेतली. हे सगळे पाहून मात्र सागरची पहिली पत्नी सावनीला मुक्ताचा प्रचंड राग येतो. आता सावनी पुन्हा काय नवीन डावपेच रचणार? हे येत्या भागात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ आणि ‘ठरलं तर मग’ या दोन्ही मालिकांना प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत.