Premachi Gosht Promo : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे. ४ सप्टेंबर २०२३ पासून सुरू झालेल्या या मालिकेला आतापर्यंत अनेक वेगळी वळणं लागली आहेत. अशात मालिकेत सध्या कोमलच्या लग्नाची लगबग सुरू आहे. मालिकेत कोमलला पाहण्यासाठी मुलाच्या कुटुंबातील व्यक्ती आल्या आहेत. मात्र, मालिकेत मोठा टि्वस्ट येतो आणि मुलाच्या घरचे कोमलला नकार देतात. तसेच आता पुढच्या भागात सागर त्याच्या बहिणीसाठी थेट एक मुलगा विकत घेत असल्याचं दिसणार आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा पुढील भागातील एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लग्नाला नकार दिल्याने कोमल जास्त नाराज असते. तिची तब्येतदेखील बरी नसते. बहिणीच्या लग्नाचं कसं होणार, याचं सागरला टेन्शन येतं. बहिणीच्या काळजीपोटी तो थेट मिहीरला फोन करतो व म्हणतो, “आपल्या कंपनीसाठी नवीन क्लाएंट येणार आहे, तो मुलगा विवाहित आहे का?” त्यावर मिहीर नाही असं उत्तर देतो. पुढे सागर त्याला म्हणतो की, “नवीन क्लाएंटला सांग मी काॅन्ट्रॅक्ट करायला तयार आहे, फक्त त्याला माझ्या बहिणीशी लग्न करावं लागेल.” सागरचं फोनवरचं हे बोलणं मुक्ता ऐकते आणि ती सागरला म्हणते की, एका मुलाने नकार दिला तर तुम्ही बहिणीसाठी थेट नवरा विकत घ्यायला निघाले आहात.”

हेही वाचा : प्रशांत दामलेंचं नवीन नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीला! सोबतीला झळकणार हृषिकेश शेलारसह ‘हे’ कलाकार

१८ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता आजच्या भागात हे सर्व घडलेलं दिसणार आहे. या भागाचा प्रोमो समोर आला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रोमोवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया आल्या आहेत.

कोमलचं लग्न का मोडलं?

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत कोमल घरात सर्वांची लाडकी आहे. सागर आणि मुक्ताचा तिच्यावर विशेष जीव आहे. तिच्या आयुष्यात सर्व आनंदाच्या गोष्टी असाव्यात असं या दोघांना वाटतं, त्यासाठी मुक्ता आणि सागर दोघेही बरेच प्रयत्न करत असतात. त्यात इंद्राच्या एका मैत्रिणीच्या मुलाचं स्थळ कोमलला येतं. हा मुलगा कोमलला फार आवडतो. त्याने आपल्याशी लग्न करावं असं तिला वाटू लागतं.

घरी पाहुणे तिला पाहण्यासाठी येतात, तेव्हा मुलाचे आई आणि बाबा दोघंच घरी येतात. मुलगा त्यांच्याबरोबर आलेला नसतो. ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या मिटींगमुळे त्याला येता येत नाही. पाहण्याचा कार्यक्रम सुरू असताना कोमलला अचानक चक्कर येते. चक्कर आल्याने ती खाली पडते आणि नंतर तिला आकडीसुद्धा येते. हे सर्व पाहून कोमलला पाहण्यासाठी आलेले मुलाचे आई-बाबा नकार देतात. आम्हाला अशा मुलीशी आमच्या मुलाचं लग्न करायचं नाही, असं ते म्हणतात.

हेही वाचा : महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन करून बाहेर येताच…”, ‘लाखात एक आमचा दादा’मधील भूमिकेविषयी अधोक्षज कऱ्हाडे काय म्हणाला?

कोमलला आकडी का आली?

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या अपूर्वा नेमळेकर सावनी हे खलनायिकेचं पात्र साकारत आहे. सावनी कोळी कुटुंबातील प्रत्येकाला त्रास देण्यासाठी कट रचत असते. आतादेखील मुक्ता आणि सागरचा कोमलवर फार जीव असल्याने ती कोमलला आकडी येणारी गोळी खाण्यासाठी देते, त्यामुळे कोमलला घरी पाहुणे पाहायला आल्यानंतर आकडी येते.