‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनी मुक्ता आणि सागरला त्रास देण्यासाठी कोणत्याही मार्गाला जात आहे. आता तिने थेट तिच्या दोन्ही मुलांच्या मनाशी खेळण्याचं काम सुरू केलं आहे. मालिकेत मुक्ता आणि सई या दोघींचा एकमेकींवर खूप जीव आहे. त्यामुळे सावनीनं थेट आदित्यच्या बदल्यात सईला आपल्याकडे ठेवलं आहे. सईला परत मिळविण्यासाठी मुक्तानंही कंबर कसली आहे. तसेच सावनीला, फक्त चार दिवसांत माझी मुलगी माझ्याजवळ असेल,असं खुलं आव्हान दिलं आहे.
त्यामुळे आता मुक्ता सईला पुन्हा घरी कशी घेऊन येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अशात नुकताच या मालिकेच्या पुढील भागाचा प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये मुक्तानं शक्कल लढवीत सावनीच्या सह्या मिळवल्या आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सावनी बुद्धिबळ खेळत आहे. तितक्यात मुक्ता चेहऱ्याला मास्क लावून तेथे येते. तसेच रुग्णालयातील फीडबॅक फॉर्मवर तुमची सही पाहिजे, असं तिला सांगते.
तो फीडबॅक फॉर्म म्हटल्यावर सावनीला तो वाचण्याचा फार कंटाळा येतो. ती म्हणते की, ते सगळं तू भर आणि सही कुठे करायची आहे ते मला सांग. त्यानंतर सावनी लगेचच त्या फॉर्मवर सही करते. तसेच सावनी जो बुद्धिबळ खेळत असते, त्यावर मुक्ता तिला चेकमेट करते. तसेच बाहेर गेल्यावर चेहऱ्यावरील मास्क काढून माझी सई लवकरच माझ्याजवळ असेल, असं मुक्ता म्हणते.
मालिकेचा हा प्रोमो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. १७ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजता हा भाग पाहता येणार आहे. मुक्ताचा हा प्लॅन तिला वकिलाने सुचवलेल्या युक्तीमुळे काहीसा शक्य होताना दिसत आहे.
मालिकेच्या मागील भागात दाखविण्यात आले की, वकिलाचा मुलगा आणि आदित्य एकाच शाळेत शिकत असतात. त्यावर आदित्य त्या मुलाशी भांडतो आणि त्याच्या वडिलांनी असं का केलं, असा प्रश्न विचारतो. मुलांमधील वाद वाढतो आणि मुक्ता वकिलाला त्यानं केलेल्या चुकीची जाणीव करून देते.
तुमच्या मुलाला तुम्ही जे केलं आहे, ते सत्य समजेल तेव्हा त्याला काय वाटेल, असं मुक्ता वकिलाला सांगते. त्यावर आपल्या मुलाच्या नजरेत आपण वाईट ठरू, अशी भावना वकिलाच्या मनात येते. त्यामुळे तो मुक्ताला मदत करतो. तसेच सावनीला फसवून, तिच्या खोट्या सह्या घेण्याची युक्ती सुचवतो. त्यामुळे वकिल्याच्या सांगण्यावरून मुक्ता हा सर्व प्लॅन करते. आता सई मुक्ताकडे पुन्हा केव्हा येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.