Premachi Goshta: महिन्याभरापूर्वी अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ लोकप्रिय मालिका सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. या मालिकेतून तेजश्रीच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे प्रेक्षकांना धक्काच बसला. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका तेजश्री प्रधानने का सोडली? यामागचं कारण अद्याप तिने स्पष्ट केलेलं नाही. पण तिच्या एक्झिटनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेवर मोठा परिणाम झाल्याचं दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतरच्या पहिल्याच आठवड्यात टीआरपी मोठ्या प्रमाणात घसरला. टीआरपीच्या यादीत नेहमी दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर असणारी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका थेट पाचव्या स्थानावर गेली. १८ जानेवारी ते २४ जानेवारीपर्यंतचा टीआरपी रिपोर्टमध्ये
‘ठरलं तर मग’ला मागे टाकून ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेने अव्वल स्थान मिळवलं. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचं टीआरपी रेटिंग ५.९ असून ‘ठरलं तर मग’ मालिकेचं ५.७ रेटिंग आलं. तर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला ४.९ रेटिंग मिळालं. त्यानंतर आता मालिकेला प्राइम टाइमवरूनच थेट हटवलं आहे. म्हणजेच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिका १० फेब्रुवारीपासून नव्या वेळेत पाहायला मिळणार आहे. संध्याकाळी ६.३० वाजता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका प्रसारित होणार आहे. तसंच सध्या ६.३० वाजता सुरू असणारी ‘उदे गं अंबे’ मालिका ६.०० वाजता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेची वेळ बदलल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे सूर पसरले असून वेळ का बदलण्यात आली? असं विचारलं जात आहे.

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगळेने घेतली आहे. स्वरदाने मराठीसह हिंदी मालिकेत काम केलं आहे. ‘माझे मन तुझे झाले’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून स्वरदा घराघरात पोहोचली आहे.

तसंच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून तेजश्री प्रधान ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे. तसंच खास मित्र परिवाराबरोबर वेळ घालवताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधानने श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट दिली होती. या आश्रमातील तेजश्रीचे फोटो व्हायरल झाले होते.