मराठी मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्रीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे तिची कोणतीही भूमिका असो, ती सुपरहिट होतेच. जान्हवी असो, शुभ्रा असो किंवा मुक्ता तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. पण, काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधानने खूप मोठा निर्णय घेतला. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केला. तिच्या या अचानक झालेल्या निर्णयामुळे चाहत्यांना धक्काच बसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडण्यामागचं अद्याप कारण स्पष्ट केलेलं नाही. पण, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्रीची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगळेने घेतली आहे. आता मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत स्वरदा पाहायला मिळत आहे. पण तेजश्री आणि ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या चाहत्यांनी अजूनही मुक्ता म्हणून स्वरदाला स्वीकारलेलं दिसत नाहीये. मालिकेच्या प्रत्येक प्रोमोवर ‘जुन्या मुक्ताला परत आणा’, ‘तेजश्री पाहिजे होती’, ‘टीआरपी घसणार’ अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या पाहायला मिळत आहेत. आता तेजश्रीच्या एक्झिटनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला मोठा फटका बसल्याचं समोर आलं आहे.

सध्या मालिकेसाठी महत्त्वाची गोष्ट आहे टीआरपी. काही दिवसांपूर्वी १८ जानेवारी ते २४ जानेवारीपर्यंतचा टीआरपी रिपोर्ट समोर आला. या टीआरपी रिपोर्टमध्ये मोठा फेरबदल झाल्याचं पाहायला मिळालं. टीआरपी यादीत पहिल्या नंबरवर असणारी मालिका ‘ठरलं तर मग’ला मागे टाकून ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेने अव्वल स्थान मिळवलं. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचं टीआरपी रेटिंग ५.९ असून ‘ठरलं तर मग’ मालिकेचं ५.७ रेटिंग आलं. तसंच दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी मोठ्या प्रमाणात घसरला. टीआरपीच्या यादीत ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका थेट पाचव्या स्थानावर गेली आणि ४.९ रेटिंग मिळालं. तेजश्री प्रधानच्या एक्झिटचा ‘प्रेमाच्या गोष्ट’ मालिकेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून तेजश्री प्रधान ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे. तसंच खास मित्र परिवाराबरोबर वेळ घालवताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तेजश्रीने श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट दिली होती. या आश्रमातील तेजश्रीचे फोटो व्हायरल झाले होते.