प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल, प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांना ऑक्टोबर महिन्यात कन्यारत्न प्राप्त झालं. मात्र, दोन महिन्यांनंतर युविकानं पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे त्यांच्या वैवाहिक नात्यात सर्व काही आलबेल नसल्याचं दिसत आहे. युविकानं १ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या प्रसूतीच्या दिवशीचा व्लॉग शेअर केला; ज्यामध्ये तिनं प्रिन्स आणि त्याच्या कुटुंबाबरोबर तिच्या प्रसूतीची तारीख ठरवली असल्याचा उल्लेख केला. त्यावर प्रिन्सनं आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरून उत्तर दिलं आहे.
प्रिन्स नरुलानं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट करीत म्हटलं, “काही लोक व्लॉगमध्ये खोटं बोलून स्वतःला खरं ठरवतात आणि काही लोक गप्प राहून चुकीचं सिद्ध होतात. या काळात काही लोकांना नात्यांपेक्षा व्लॉग महत्त्वाचा आहे. ही दु:खद गोष्ट आहे.”
हेही वाचा…विक्रांत मॅसीच्या निवृत्तीच्या घोषणेवर त्याच्या सहकलाकाराने व्यक्त केली शंका, म्हणाला “हा तर पीआर…”
युविका चौधरीच्या व्लॉगबाबत बोलायचं झाल्यास, तिनं आपल्या प्रसूतीच्या दिवसांचा अनुभव व्हिडीओद्वारे शेअर केला आहे. रुग्णालयात जाण्यापूर्वी तिला डॉक्टरांनी प्रसूतीच्या अपेक्षित तारखेच्या दोन दिवस आधी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिल्याचं तिनं सांगितलं. मात्र, प्रिन्स शूटिंगमधून दोन दिवसांची सुट्टी घेणार असल्यामुळे तिनं काही दिवस थांबण्याचा निर्णय घेतला. तिच्या प्रसूतीच्या वेळी प्रिन्स तिच्याबरोबर असावा, अशी तिची प्रबळ इच्छा होती.
हॉस्पिटलला जात असताना तिनं प्रिन्सला कळवलं की, ती फक्त तो उशिरा येणार म्हणून त्या दिवशी अॅडमिट होणार आहे. युविकानं प्रिन्सबरोबरच्या व्हिडीओ कॉलचा स्क्रीनशॉटही शेअर केला. हॉस्पिटलला पोहोचल्यावर तिनं व्लॉग संपवताना प्रिन्सच्या कुटुंबीयांना तिच्या प्रसूतीच्या वेळेस येण्यासाठी आमंत्रण दिल्याचा उल्लेख केला.
प्रिन्स नरुलानं यापूर्वी युविकानं त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना प्रसूतीच्या तारखेबद्दल सांगितलं नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे हा सगळा गोंधळ सुरू झाला. सध्या चाहते या परिस्थितीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, अद्याप या जोडप्यानं कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही.