दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने रोडीज शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक केले. तरुणाईत प्रचंड लोकप्रिय असलेल्या रोडीज शोच्या १९ व्या सीझनला सुरुवात झाली असून यामधील गॅंग लीडर आता बदलण्यात आले आहेत. यंदाच्या सीझनमध्ये प्रिन्स नरुला, रिया चक्रवर्ती आणि गौतम गुलाटी हे गॅंग लीडर असतील. जूनपासून हा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या शोचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु अवघ्या काही दिवसांतच या शोचे शूटिंग थांबविण्यात आले आहे.
हेही वाचा : ‘जवान’ची नवी रिलीज डेट ऐकून बॉलीवूड निर्माते सतर्क! आता ‘फुक्रे ३’ या दिवशी होणार प्रदर्शित
रोडीज गॅंग लीडर प्रिन्स नरुला आणि रिया चक्रवर्ती यांच्यात झालेल्या वादामुळे या शोचे संपूर्ण शूटिंग थांबविण्यात आले आहे. रोडीजच्या नव्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात झाल्यापासून प्रिन्स, रिया आणि गौतम या तिन्ही गॅंग लीडर्समध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. किरकोळ कारणांवरून प्रिन्स सतत गौतम आणि रियाशी भांडत आहे, अशातच एका भांडणादरम्यान प्रिन्सने रियाचा अपमान केला आणि तिला धमकी दिल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण घटनेची तक्रार रियाने रोडीजच्या क्रूकडे केली आहे. त्यानंतर रोडीजचे शूटिंग थांबविण्यात आले आहे.
दरम्यान, या वादानंतर प्रिन्सने रियाची माफीसुद्धा मागितली, परंतु रियाने काहीही मान्य न करता प्रिन्सची तक्रार केली आहे. गौतम आणि रियाने प्रिन्ससोबत शूटिंग करण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा : भर कार्यक्रमात प्रसिद्ध गायिकेची उडाली तारांबळ! बसण्यासाठी जागा सापडेना, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
प्रिन्स आणि रियामध्ये नेमका कोणत्या गोष्टीवरून वाद झाला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नसून रोडीजचे एपिसोड प्रसारित झाल्यावर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. रोडीज हा शो येत्या ३ जूनपासून दर शनिवार आणि रविवारी संध्याकाळी ७ वाजता एमटीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.