९० च्या दशकातील मराठमोळ्या अभिनेत्री सध्या छोट्या पडद्यावर काम करून प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. निवेदिता सराफ, किशोरी निवेदिता सराफ, किशोरी आंबिये, ऐश्वर्या नारकर अशा बऱ्याच अभिनेत्रींनी मालिकाविश्वात आपल्या अभिनयानं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता आणखी एक ९० च्या दशकातील अभिनेत्री म्हणजेच प्रिया बेर्डे पुन्हा एकदा मालिकाविश्व गाजवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
नाटक, चित्रपट, राजकारण या सगळ्यांमध्ये अधिक सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे आता छोट्या पडद्यावर पुनरागमन करीत आहेत. त्यांनी यापूर्वीही बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, सात वर्षांच्या विश्रांतीनंतर आता त्या पुन्हा एकदा महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
हेही वाचा – AI ने तयार केला महेश मांजरेकरांचा जबरदस्त लूक; स्वतःचाच फोटो पाहून म्हणाले, “माझी इच्छा…”
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या नव्याकोऱ्या मालिकेत प्रिया बेर्डे दिसणार आहेत. या मालिकेतून सिंधुताई यांचं बालपण दाखवण्यात येणार आहे. प्रिया बेर्डे या सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठे या भूमिकेत दिसणार आहेत.
याविषयी ‘राजश्री मराठी’ या एंटरटेन्मेंट मीडियाबरोबर बोलताना प्रिया बेर्डे म्हणाल्या की, “माझ्याकडे ही मालिका अचानक आली. मी सात वर्षांपासून मालिकाच केलेल्या नव्हत्या. चित्रपट केले, नाटकं केली. भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून कलाकार आणि तंत्रज्ञान यासाठी खूप काम करतेय. त्यामुळे या सगळ्या व्यापातून मालिका करणं खूप अवघड होतं. पण ‘कलर्स’ने खूप सपोर्ट केला. आमचे निर्माते मंगेश जगताप यांनी माझ्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. ते म्हणाले, ‘१०-१५ दिवस नक्की द्याल ना?’ तर मी म्हटलं की, नक्की देईन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंधुताई यांच्यावर आधारित मालिका असल्यामुळे मी होकार दिला.”
हेही वाचा – ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील अभिनेत्रीने उरकला साखरपुडा; फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
हेही वाचा – सलमान खानचे फॉलोवर्स कमी झाले म्हणून राखी सावंत भडकली; व्हिडीओ झाला व्हायरल
दरम्यान, प्रिया बेर्डे यांच्याव्यतिरिक्त या मालिकेत अभिनेते किरण मानेसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांच्या भूमिकेत किरण माने पाहायला मिळणार आहेत. ‘सिंधुताई माझी माई’ मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.