गेल्या कित्येक दशकांपासून मनोरंजनसृष्टीत अभिनेत्री प्रिया बेर्डे सक्रिय आहेत. नाटक, चित्रपट, मालिका यांच्याबरोबर त्या आता राजकारणात सक्रिय असतात. २०२३मध्ये प्रिया बेर्डे यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत त्या झळकल्या. त्यानंतर आता प्रिया बेर्डे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘मुलगी पसंत आहे’ मालिकेत पाहायला मिळत आहे. याच मालिकेत सध्या लग्नाचा सिक्वेन्स सुरू आहे. त्यानिमित्ताने प्रिया बेर्डेंनी माध्यमांशी खास संवाद साधला. यावेळीच प्रिया बेर्डेंनी भावी सून, जावयाकडून असलेल्या अपेक्षांबद्दल सांगितलं.

‘अल्ट्रा बझ मराठी’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना प्रिया बेर्डेंना विचारलं होतं की, खऱ्या आयुष्यातल्या भावी सूनेकडून आणि जावयाकडून काय अपेक्षा आहेत? प्रिया बेर्डे म्हणाल्या, “माझ्या काहीही अपेक्षा नाहीत. त्यांनी त्यांचा संसार चांगला करावा. उत्तम करावा. कारण आई-वडील त्यांच्या आयुष्याला पुरलेले नसतात. आजकालच्या मुलांमध्ये, कपल्समध्ये बॉन्डिंग हा प्रकारचं दिसत नाही. एकतर सगळे शिकले सरवलेले आहेत. ही उत्तम गोष्ट आहे. पण त्याचा विपर्यास न करता एकमेकांमध्ये समजूतदारपणा असावा. शेवटी संसार हा प्रेमापेक्षाही समजूतदारपणावर अवलंबून असतो. मग ते नवरा-बायकोचं असू दे, आई-बाबांबरोबर असू दे किंवा बहिणी-भावांबरोबर आपण सगळे एकमेकांबरोबर समजूतीने राहिलं पाहिजे.”

पुढे प्रिया बेर्डे म्हणाल्या, “लग्न म्हणा, रिलेशनशिप म्हणा, त्याच्यामध्ये भाड्याला भांड लागतं. काहींना काहीतरी गोष्टी होतात. असं तुम्हाला कुठेच दिसणार नाही. तिथे काहीच घडतं नाही. मग अशी लोकं नॉर्मलच नाही असं मी म्हणेण. म्हणजे गोड वातावरण कधी कुठे नसतं. तिथे तुम्ही समजूतीने राहावं लागतं. आताच्या कपल्समध्ये जास्त बघते, भले आठ-नऊ वर्ष रिलेशनशिपमध्ये असतील. पण लग्न केल्यानंतर एक-दोन वर्षांमध्ये त्यांचा घटस्फोट होतो. तू असं केलंस तर मीही करणार, हा जो अ‍ॅटिट्यूड आहे. तो चुकीचा आहे. त्यामुळे चुकीच्या गोष्टींना आपण नक्कीच प्राधान्य द्यायचं नाही. पण तरीही सुद्धा सामोपचाराने, प्रेमाने गोष्टी सोडवू शकतो. कारण आजकाल ५०-६० वर्ष झालेले कपलला बघितलं की खूप कौतुक वाटतं. किती छान, आयुष्यात काय काय गोष्टी बघितल्या असेल. किती उतार-चढाव बघितले असतील. हे फार कौतुकास्पद आहे.”

“त्यावेळी एकत्र राहणारं कुटुंब होतं, त्यामध्ये २०-२५ लोक होते. आमच्या बेर्डे कुटुंबातच जवळपास चुलत सख्खे असे एकत्र राहत होते. आमचं कुंभारवाड्यामध्ये घर आहे तिथे राहत होतो. तिथे जवळपास चार भाऊ, माझ्या चार जावा. त्यात चुलत तीन भाऊ, असे जवळपास २०-२५ माणसं एकत्र राहायचे. आमच्यात जे बॉन्डिंग झालं आहे ते अजूनपर्यंत आहे. आता सगळे वेगवेगळे झाले, पण तरीही सुद्धा एकत्र आहोत. सगळ्या कार्यक्रमांना एकत्र भेटतो. कुठली वाईट घटना घडली. तिथे आम्ही एकत्र असतो. चांगल्या घटनेंमध्ये सेलिब्रेशनला आम्ही एकत्र असतो. त्यामुळे बॉन्डिंग फार महत्त्वाचं आहे. ते कोणाबरोबरही असू दे,” असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.

पुढे प्रिया बेर्डे म्हणाल्या की, माझ्या मुलांकडूनही तिच अपेक्षा आहे. मी आता त्यांना तेच सांगितलं, मी तुमच्यामध्ये नाही पडणार. तुमचं आयुष्य आहे, तुम्ही कसं करायचं, कशा पद्धतीने ते तुम्ही पुढे न्यायचं हा तुमचा प्रश्न आहे. पण, एवढी मी अपेक्षा नक्की करेन एकमेकांना सांभाळून राहा. कुटुंब एकमेकांना जोडलेलं हवं. कुटुंबाशी जोडून राहा. शेवटी तुमच्या चांगल्या वाईट प्रसंगाला तुमचं कुटुंब येतं. बाहेरच्या लोकांपेक्षा जास्त कुटुंब अशा काळात मदत करत. बस एवढंच माझं म्हणणं आहे.