प्रिया बेर्डे( Priya Berde) या मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. विनोदी चित्रपटांसाठी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे अशा अभिनेत्यांच्या बरोबरीनेच प्रिया बेर्डे यांनादेखील ओळखले जाते. ‘गृहलक्ष्मी’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘एक होता विदूषक’, ‘धरलं तर चावतंय’ अशा अनेक चित्रपटांतून प्रिया बेर्डे यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आताही त्या विविध प्रकल्प, टीव्ही मालिका यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. सध्या त्या ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेत काम करताना दिसत आहेत. आता नुकतेच त्यांनी भविष्यात कोणती व्यक्तिरेखा साकारायला आवडेल, यावर वक्तव्य केले आहे.
काय म्हणाल्या प्रिया बेर्डे?
प्रिया बेर्डे यांनी नुकताच ‘अल्ट्रा मराठी बझ’बरोबर संवाद साधला. यावेळी भविष्यात त्यांना कोणती व्यक्तिरेखा साकारायला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी म्हटले, “मला पौराणिक कथा फार आवडतात. त्यामुळे मला देवीची आणि त्यातही कालीमातेची भूमिका करायला मिळाली, तर आवडेल. माझ्याकडे पौराणिक कथांची खूप पुस्तकं आहेत. महाभारतातील सगळ्या व्यक्तिरेखांची पुस्तकं माझ्याकडे आहेत. मला त्यातील सगळ्या व्यक्तिरेखा आवडतात. कोणे एकेकाळी महाभारतावर नाटक येणार होतं; पण ते आलंच नाही. त्यामध्ये द्रौपदीच्या भूमिकेसाठी त्यांनी मला विचारलं होतं. ही ३५-४० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते काही झालं नाही; पण माझ्या मनात ती गोष्ट राहून गेली. माझ्या आईनं ‘सौभद्र’मध्ये रुक्मिणी ही भूमिका साकारल्याचं मला आठवते. सौभद्र हे संगीत नाटक आहे. तर, ती रुक्मिणी कधी साकारायला मिळाली, तर मला आवडेल. मला अमुक अमुक गोष्टी करायच्या आहेत वगैरे अशा काही इच्छा माझ्या राहिल्या नाहीत. मला इन्स्पेक्टर, रॉ एजंट अशाही भूमिका करायला आवडेल.”
चित्रपटसृष्टीत तुम्हाला इतक्या वर्षांचा अनुभव आहे. तर मग त्यातील कोणती मौल्यवान गोष्ट शेअर करायला आवडेल, अशा आशयाचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना प्रिया बेर्डे यांनी म्हटले, “खरं सांगायचं, तर मी माझं आयुष्य या कलासृष्टीमध्ये घातलेलं आहे. मीच नाही, तर माझे आई-वडील, मामा-मामी, काका-काकू, आजी-आजोबा, माझे संपूर्ण खानदान या चित्रपटसृष्टीत आहे. ही माझी मनोरंजन सृष्टी माझ्या चांगल्या-वाईट क्षणांची साक्षीदार आहे. जेव्हा जेव्हा मी एकटी पडले किंवा होते तेव्हा तेव्हा मला इंडस्ट्रीने साथ दिली आहे. त्यामुळे मला ज्या ज्या वेळी वाटलं की, सगळं संपत चाललं आहे, प्रिया बेर्डे संपत चालली आहे अशा वेळी मला याच इंडस्ट्रीनं वरती बाहेर काढलं आहे. ते क्षण माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाच्या वेळी मी नुकतीच उभारी घेत होते. इंडस्ट्रीमध्ये मी नवीनच आले होते. माझं खानदान इंडस्ट्रीमधील असूनसुद्धा मला त्याचा काही उपयोग नव्हता. माझ्या स्वत:च्या कर्तृत्वावरच मला काम करावं लागलं. दुसरं म्हणजे लक्ष्मीकांत गेले, त्यावेळी मी काम करत नव्हते. तुम्ही काम सोडलेलं असताना परत जेव्हा तुम्ही पुनरागमन करता त्यासाठी लागणारं बळ असतं, ते या इंडस्ट्रीनंच मला दिलेलं आहे. तेव्हा मला ही गोष्ट सतत जाणवते की, माझा मौल्यवान क्षण हाच आहे की, ज्या ज्या वेळी मी त्या गर्तेत सापडले, त्या त्या वेळेला माझ्या इंडस्ट्रीनं आणि माझ्या परमेश्वरानं मला त्यातून बाहेर काढलं आहे. ही कलानगरी, मनोरंजन सृष्टी माझ्यासाठी देव आहे.”
हेही वाचा: “मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
दरम्यान, अरुण सरनाईक, संजीव कुमार, रंजना, नीतू सिंह, रेखा, रीना रॉय, प्राणसाहेब, राजशेखर, दत्ता साळवी, अमरीश पुरी, डॅनी हे कलाकार आवडत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘अशी ही बनाबनवी’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, हे मराठी चित्रपट आवडतात. तर हिंदीमधील ‘चुपके चुपके’, ‘अंगूर’, ‘बावर्ची’, ‘खूबसुरत’, ‘नौकर’, हे पाच चित्रपट आवडतात, असेही प्रिया बेर्डे यांनी सांगितले.