मराठी मनोरंजसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत की, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. दररोज निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. मराठीतील बहुतांश कलाकार मुंबईत राहतात. आता मुंबई म्हणाल, तर कलाकारांनाही ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. या ट्रॅफिकमुळे अनेकदा त्यांना शूटिंगला पोहोचायला उशीरही होतो. मुंबईचे ट्रॅफिक टाळण्यासाठी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने एक युक्ती वापरली आहे. तिने सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडीओही शेअर केला आहे.
मुंबईतील ट्रॅफिक टाळण्यासाठी व शूटिंगवर वेळेवर पोहोचण्यासाठी अनेक कलाकार लोकलमधून प्रवास करतात. मात्र, लोकलसारख्या सार्वजनिक ठिकाणी या कलाकारांना बघिल्यानंतर चाहते त्यांचा किंवा त्यांच्याबरोबर स्वत:चा फोटो घेण्यासाठी एकच गर्दी करतात. अशा वेळेस अनेकदा कलाकार आपला चेहरा झाकून प्रवास करताना दिसतात. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेनेही असाच काहीचा प्रयत्न केला आहे. शूटिंगवर वेळेत पोहोचता यावे यासाठी प्रियाने तोंडाला स्कार्फ बांधून एसी लोकलमधून प्रवास केला आहे. प्रियाने आपल्या इन्स्टाग्रामवर प्रवासादरम्यानचा व्हिडीओही शेअर केला आहे.
हेही वाचा- अंकिता लोखंडेच्या पतीबाबत समर्थ जुरैलचा मोठा खुलासा; म्हणाला, “बिग बॉसच्या घरात विकी जैन चार दिवस…”
प्रियाने व्हिडीओ शेअर करीत लिहिले, “लोक मला विचारतात की, तुम्ही लोकलने प्रवास करता का? त्यांना मी सांगते हो. मी कधी कधी ट्रेनने प्रवास करते. कारण- मुंबईचं ट्रॅफिक टाळण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. त्यात एसी ट्रेन म्हणजे जस्ट लाइक अ वॉव! आणि मी असा प्रवास करते.” प्रियाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव केला आहे.
प्रियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून प्रिया घराघरांत पोहोचली. आतापर्यंत प्रियाने अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम केले आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील प्रियाची भूमिका चांगलीच गाजली. मराठीबरोबर प्रियाने हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.