Priyadarshini Indalkar : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. या विनोदी कार्यक्रमातून तिने अनेक विनोदी स्किट्स करत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिनयामुले चर्चेत असणारी प्रियदर्शिनी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
प्रियदर्शिनी इंदलकरची नदी शुद्धीकरणासाठी पोस्ट
अभिनेत्रीने पुण्याच्या नद्यांच्या परिस्थितीबद्दल भाष्य करणारा हा व्हिडीओ शेअर केला आहे. पुण्यात नद्यांच्या पात्रांच्या रुंदीकरण सुरू आहे. पण यामुळे पुरस्थिती आणि भविष्यात शहराची भूजल पातळी खालावली जाण्याची शक्यता असल्याने याबद्दल आवाहन करण्यासाठी प्रियदर्शिनीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने असं म्हटलं आहे की, मी पुण्याच्या नद्यांबद्दल बोलत आहे. तिथल्या नद्यांची अवस्था किती वाईट आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पुणेकर ते रोज जगत आहेत. पुण्यात राहणारे हे रोज अनुभवत आहेत. नदी आपली किती अस्वच्छ आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही.”
नदीपात्रांच्या काँक्रीटीकरणाबद्दल व्यक्त केली नाराजी
यापुढे अभिनेत्रीने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, “नदीपात्र स्वच्छ करण्याचे प्रकल्प सोडून नदीपात्रांचं काँक्रीटीकरण सुरू आहे. नदीचे पात्रे रुंद करणं हे प्रकल्प पुणे महानगरपालिका करत आहे. या सगळ्या प्रकल्पामध्ये नदी पात्रालगतची झाडे नष्ट होत आहेत. तिथली जैविकसृष्टी नाश पावत आहे आणि यामुळे नदी पात्र रुंद होण्याची शक्यता आहे, ज्याने भयानक पुर उद्भवण्याची शक्यता आहे. तसंच शहराची भूजल पातळी खालावण्याचीही शक्यता आहे. तर नदीपात्र चकचकीत होईल; पण त्याने नदीपात्र स्वच्छ होणार नाही आणि नदीच्या आजूबाजूला निसर्ग आहे तोही जपता येणार नाही.”
प्रकल्पाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन
यापुढे तिने आवाहन करत असं म्हटलं आहे की, “या प्रकल्पाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सगळे जण एकत्र या. यासाठी २७ एप्रिल रोजी पदयात्रा काढली जाणार आहे. सकाळी ८ वाजता पिंपळे निलख मधील शहीद अशोक कामटे उद्यान इथून ही पदयात्रा सुरू होणार आहे. मागण्या दोनच आहेत. एक म्हणजे आरएफडीच्या नावाखाली निसर्गाचा विध्वंस सुरू आहे, तो कृपया थांबवा आणि दुसरं म्हणजे नदीचं शुद्धीकरण झालं पाहिजे.”
कर भरूनही शुद्धीकरण होत नसल्याबद्दल व्यक्त केली खंत
यानंतर प्रियदर्शिनीने असं म्हटलं आहे की, “पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे नागरीक जो कर भरतात, त्यातून हजारो कोटींचं बजेट खर्च होऊन शुद्धीकरण होतच नाहीये. नद्या शुद्ध होतंच नाहीयेत. हा प्रकल्प आधी झाला पाहिजे. सगळ्यात आधी नद्यांमध्ये सांडपाणी सोडणं त्वरीत थांबवलं पाहिजे. या दोन अत्यंत साधारण आणि गरजेच्या मागण्या आहेत, ज्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आवाज उठवणं गरजेचं आहे. त्यासाठी हे आवाहन आहे.”