प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा(Maharashtrachi Hasyajatra). अफलातून विनोद व कलाकारांचा सहजसुंदर अभिनय यांमुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतो. समीर चौघुले, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव असे अनेक कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. आता या कार्यक्रमाचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचबरोबर याच कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर होय. आता या अभिनेत्रीने एका मुलाखतीत महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील काही किस्से सांगितले आहेत.
अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने नुकताच प्लॅनेट मराठी या यूट्यूब चॅनेलबरोबर संवाद साधला. यावेळी तिला विचारण्यात आले की, नवीन सीझनमध्ये काय पाहायला मिळणार आहे? त्यावर बोलताना तिने म्हटले, “मी व शिवाली शालू-मालूकडून रोस्ट होतो, हे सीझनचं शेवटचं स्कीट होतं. आता वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगवेगळी नवीन पात्रं येणार आहेत. आता लोकांना सीरिज इतक्या माहीत झाल्या असल्यामुळे हास्यजत्रेचं मल्टीव्हर्स तयार झालं आहे. या सीरिजमधील पात्रं दुसऱ्या सीरिजमध्ये आली आहेत. अशा गोष्टी आता जास्त होतील. आधी नवीन संकल्पना एवढाच साठा होता. आता सीरिजना घेऊन नवीन संकल्पना, असा अधिकचा एक भाग तयार झाला आहे. त्यासाठी हीच तयारी आहे की, आपला सीरिजचा सेटअप सोडून ते पात्र तितक्याच खरेपणानं दुसऱ्या सीरिजमध्ये साकारणं. आधीच सेट असलेल्या सीरिजमध्ये घुसायचं असेल, तर त्यांची एनर्जी मॅच करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. तर ही तयारी आहे.”
महाराष्ट्राची हास्यजत्रेत काम करण्याच्या पहिल्या दिवशी किती दडपण होतं? यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “मी २०१९ पासून हास्यजत्रेत आहे. पहिला आमचा कॉम्पिटिशनचा सीझन होता. तेव्हा दोघा-दोघांचे स्कीट व्हायचे. खरं तर मी या फॉरमॅटसाठी अजिबातच बनलेली नाहीये. काही काही कलाकारांकडे बघितल्यावर असं वाटतं की, हे या फॉरमॅटमध्ये चपखल बसतात. जसे समीरदादा, पशादादा आहेत, तर त्यांना तो फॉरमॅट कळलाय. तर सुरुवातीला दडपण होतं. जेव्हा माझी ऑडिशन झालेली तेव्हा मी गोस्वामीसरांना सांगितलं होतं की, सर मला लाऊड अॅक्टिंग जमत नाही. सर म्हटले की, लाऊड करायचं नाहीये, खरं करायचं आहे. इथपासून सुरू झालं. मला जागा काढणं हा प्रकार माहीत नव्हता. आपल्याकडून कॉमेडी कशी क्रिएट होईल हे माहीत नव्हतं. मला अभिनय करणं एवढंच माहिती होतं. आता जे काही येतंय, ते सगळं गोस्वामीसर, मोठे सर यांच्या स्कूलिंगमधून आलेलं आहे. हळूहळू तो सूर सापडत गेला आणि सरांनीदेखील तितका संयम ठेवला. संधी दिल्या.”
अभिनेत्रीने या कार्यक्रमातील एखादा किस्सा सांगावा यासाठी तिला विचारले असता, तिने म्हटले, “माझी स्किटमध्ये एन्ट्री होती आणि काहीतरी वाक्यं पुढे-मागे झाली. शंकर-शितलीचं स्कीट होतं ते आणि मी विगेंत होते. मला वाटलं हा पॅच आला म्हणजे आपली एन्ट्री आहे; पण त्यांनी वाक्यांची सगळी भेसळ केली होती आणि कशानंतर काहीही आलं होतं. त्यामुळे तो पॉइन्ट आला नव्हता, जिथे माझी एन्ट्री होणार होती; पण मला वाटलं की त्याच वेळी एन्ट्री आहे. त्यामुळे ए शंकरा, असं करत मी एन्ट्री घेतली. मग मला सांगण्यात आलं की नाही, थांब प्रिया आता नाहीये. त्या स्किटनंतर इतकं हसं झालं होतं. परत थोड्या वेळानंतर मी एन्ट्री घेतली आणि तीही चुकली. तिसऱ्यांदा घेतली ती बरोबर घेतली आणि स्किट पुढे गेलं.”
पुढे बोलताना तिने एक किस्सा सांगताना म्हटले, “अरुणदादांचं स्किट झालं होतं. कोहली फॅमिलीचं स्किट होतं, ज्याच्यासमोर लेले फॅमिली येते. त्या स्किटला आम्ही सगळे फक्त थांबून हसत होतो. जन्मती गणपती पुले, असे जे काही ते म्हणाले. म्हणजे रिहर्सलासुद्धा प्रत्येक वेळी त्याच ठिकाणी ते वेगळंच काहीतरी बोलायचे. तर माझा जन्म गणपती पुळे, असं त्यांच्याकडून वदवून घेतलं होतं आणि तरीसुद्धा स्किटमध्ये ते वेगळंच बोलले आणि आम्ही सगळे हसत होतो. सगळा अख्खा स्टुडिओ हसतोय, दोन मिनिटं सगळे फक्त हसतोय आणि मग स्किट सुरू झालं”, असा किस्सा अभिनेत्रीने सांगितला आहे.
दरम्यान, लवकरच महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.