प्रियांका चहर चौधरी बिग बॉस १६ ची ट्रॉफी जिंकू शकली नसली तरीही तिने लाखो लोकांची मनं मात्र जिंकली आहेत. प्रियांका बिग बॉस १६ च्या टॉप २ मध्येही पोहोचू शकली नव्हती. अखेरच्या क्षणी एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत एमसी स्टॅनने बाजी मारत बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. प्रियांका या स्पर्धेतून बाहेर पडली असली तरी बिग बॉसच्या घरात तिने बऱ्याच गोष्टी जिंकल्या आहेत.
बिग बॉसच्या घरात असतानाच सलमान खानने प्रियांकासाठी त्याच्याकडे ऑफर असल्याचं सांगितलं होतं. तर दुसरीकडे प्रियांका आगमी काळात शाहरुख खानच्या चित्रपटातही दिसणार असल्याचं बोललं गेलं होतं. आता यावर प्रियांकाने प्रतिक्रिया दिली आहे. ‘बिग बॉस १६’ संपल्यानंतर ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ऑफर्सच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. एवढंच नाही तर टीव्हीवर काम करणं चालूच ठेवणार असल्याचंही तिने सांगितलं.
आणखी वाचा- “मला बॉलिवूडमध्ये काम करायचं आहे पण…” ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकलेल्या एमसी स्टॅनने दिली प्रतिक्रिया
या मुलाखतीत प्रियांकाला, “शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपटसाठी तुला ऑफर मिळाली आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तर देताना ती म्हणाली, “मला शाहरुख खान सरांच्या चित्रपटाबाबत काहीच माहिती नाही. मी आत्ताच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहे आणि मला कोणाशीच बोलण्यासाठी वेळ मिळालेला नाही. सलमान सरांनी मला शो संपल्यानंतर भेटण्यास सांगितलं होतं तर मी त्यांना भेटणार आहे. पण यापेक्षा जास्त मला काहीच माहिती नाही. सलमान आणि शाहरुख खान माझ्यासाठी देवासमान आहेत. पण ऑफर्सबद्द मला काहीच माहीत नाही.”
दरम्यान या शोमध्ये जेव्हा फराह खान आली होती त्यावेळी तिने प्रियांकाला बिग बॉसच्या घरातली दीपिका पदुकोण म्हटलं होतं. यामुळे प्रियांकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याच शोमध्ये झालेल्या एका ब्यूटी ब्रँडच्या स्पर्धेत प्रियांकाने २५ लाख रुपये जिंकले आहेत. याशिवाय ती शोची दुसरी रनरअप ठरली. शो जिंकू न शकल्याबद्दल बोलताना ती म्हणाली होती की, “एमसी स्टॅन खूप खरा व्यक्ती आहे. त्यामुळे तो जिंकला. पण स्टॅनपेक्षा जास्त शिव ठाकरे त्या ट्रॉफीसाठी पात्र स्पर्धक होता असं मला वाटतं.”