‘बिग बॉस १६’ हा शो सध्या ग्रँड फिनालेच्या दिशेने जात आहे. अशातच या आठवड्याच्या सुरुवातीला बिग बॉसने स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का देत त्यांच्या कुटुंबातील एकेक सदस्याला घरात आणलं होतं. प्रियांका चहर चौधरीच्या घरून तिचा भाऊ योगेश ‘बिग बॉस’च्या घरात आला होता. त्याने बहीण प्रियांका आणि घरातील सदस्यांबरोबर वेळ घालवला. त्यानंतर घराबाहेर पडलेल्या योगेशने बहीण प्रियांका व अंकित गुप्ता यांच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
अमृता फडणवीसांचा शिव ठाकरेला पाठिंबा, म्हणाल्या “महाराष्ट्राचा..”
‘इंडिया टुडे’शी बोलताना योगेश म्हणाला, “त्यांचा स्वभाव आग आणि पाण्यासारखा आहे. पाण्याचा स्वभाव असा आहे की ते स्थिर राहतं, आरामात राहतं, अंकित तसा होता. तर, प्रियांकाला खूप लवकर राग येतो. ती अंकितवर वर्चस्व गाजवणारी नाही. पण, अंकितचा स्वभाव सामान्य होता आणि प्रियांका जास्त बोलते, ती जे असेल ते लोकांच्या तोंडावर बोलते, त्यामुळे बऱ्याचदा लोकांना तिच्याबद्दल गैरसमज होतात.”
योगेशने निम्रृतच्या वडिलांनी लावलेल्या फेक फॉलोअर्सच्या आरोपांवरही उत्तर दिलं. प्रियांकाचे सोशल मीडियावर फेक फॉलोअर्स असून ते निमृतविरोधात पोस्ट करतात, असा दावा निमृतच्या वडिलांनी केला होता. “मी त्यांना सोशल मीडियावर अधिक सक्रिय राहण्यास सांगेन. कारण त्यांच्या आरोपांवरून तरी ते सोशल मीडियाचा जास्त वापर करत नाहीत, असं दिसतंय,” अशी प्रतिक्रिया योगेशने दिली.
दरम्यान, सध्या ‘बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरे, प्रियांका चौधरी, अर्चना गौतम, सौंदर्या शर्मा, साजिद खान, अब्दू रोजिक, टीना दत्ता, शालीन भानोत, श्रीजिता डे, एमसी स्टॅन आणि सुंबूल तौकीर खान हे सदस्य आहेत.