आज एकूणच टेलिव्हिजनवरील मालिकांना लोक कंटाळले असले तरी एक काळ असा होता की टेलिव्हिजन वाहिन्यांनी मराठी मनोरंजनविश्वात क्रांति घडवून आणली होती, अन् त्यातील एक प्रमुख नाव होतं ते म्हणजे ‘झी मराठी’ या मराठी वाहिनीचं. नुकतंच ‘बोल भिडू’च्या यूट्यूब चॅनलवर ‘झी मराठी’ वाहिनी शून्यातून उभे करणारे प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक नितीन वैद्य आणि सध्याचे सोनी मराठीचे प्रमुख अजय भाळवणकर यांनी हजेरी लावली.
या शोमध्ये नितीन वैद्य आणि अजय भाळवणकर यांनी त्यांचा टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रवास आणि एकूणच ‘झी मराठी’ हे चॅनल शून्यातून निर्माण करून त्यातून नफा मिळवून कॉर्पोरेट जगताला मराठी वाहिन्यांची दखल घ्यायला भाग पाडणं यामागील संघर्षाबद्दल चर्चा केली. या सांभाषणादरम्यान ‘झी मराठी’च्या अजरामर जुन्या मालिकांपासून कित्येक दर्जेदार कार्यक्रमांचा उल्लेख झाला. अन् याचवेळी ‘झी मराठी’ने सुरू केलेल्या ‘नक्षत्रांचे देणे’ या अप्रतिम कार्यक्रमाचं नाव समोर आलं.
आणखी वाचा : “सून म्हणजे टाइमपास…” ट्रोलरच्या ‘त्या’ खोचक कॉमेंटवर करण जोहरची संतप्त प्रतिक्रिया
एक कवि किंवा गीतकार यांचा एक संगीतमय प्रवास मांडणारा हा एक आगळावेगळा प्रयोग होता. ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमाला ठराविक वर्गाकडून, मराठी साहित्याची जाण असलेल्या प्रेक्षकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला, परंतु २७ भागांच्या या प्रयोगातून आर्थिक नफा मात्र अजिबात झाला नाही. प्रेक्षकांच्या अभिरुचिची या कार्यक्रमाने चांगलीच दखल घेतली परंतु यातून वाहिनीला फारसा फायदा झाला नाही अन् नंतर हा प्रयोग थांबवावा लागला. याविषयीच नितीन वैद्य यांनी सविस्तरपणे भाष्य केलं आहे.
नितीन वैद्य म्हणाले, “नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रमसाठी मोठमोठे लेखक आणि कवि रांग लावून उभे असायचे. तेव्हा हा कार्यक्रम मुंबई आणि पुणे अशा दोन्ही ठिकाणी शूट व्हायचा. आजही कुठे गेलो की नक्षत्रांचे देणेची लोक आठवण काढताना मला दिसतात. हा कार्यक्रम एक विशिष्ट वर्ग बघतोय पण त्याला रेटिंग येत नव्हतं. ‘नक्षत्रांचे देणे’चे आपण २७ भाग केले पण त्यातून आर्थिक नुकसानच पदरी पडलं. नंतर तो कार्यक्रम आवरता घ्यावा लागला, अन् मग नंतर सामान्य प्रेक्षक म्हणजेच मासेस यांना टेलिव्हिजनकडे खेचून आणण्यासाठी ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम सुरू झाला.
पुढे नितीन वैद्य म्हणाले, “होम मिनिस्टर हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. त्यात घरातील महिलेला केंद्रस्थानी ठेवून तिला पैठणी बक्षीस म्हणून देणं, तिचे ती पैठणी नेसून घरात कॅटवॉक करणं, तिच्या नवऱ्याने तिला उचलून घेणं हे सगळं फारच वेगळं रूप होतं. अन् होम मिनिस्टरने हे सिद्ध करून दाखवलं की हा प्रयोगही तितकाच यशस्वी होऊ शकतो, किंबहुना अजूनही तो कार्यक्रम तितकाच यशस्वी आणि लोकप्रिय आहे.”