अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेली ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका चांगलीच चर्चेत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत राकेशने साकारलेला एजे (अभिराम जहागीरदार) व वल्लरीने साकारलेली लीला प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतील पडली आहे. एवढंच नव्हे तर इतर कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांना देखील प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळत आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेची दिवसेंदिवस लोकप्रिय वाढताना दिसत आहे. सध्या मालिकेत एजेच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे एजेची आई सरोजिनी जहागीरदारांनी दुर्गाचा नवरा किशोर जहागीरदारला देखील लग्नाचं आमंत्रण देण्याबाबत एजेला सांगितलं. यावेळी एजेने हा निर्णय दुर्गाने घ्यावा असं स्पष्ट सांगितलं. त्यामुळे आता दुर्गा काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण किशोर जहागीरदारच्या भूमिकेत ‘पुढचं पाऊल’ फेम अभिनेता झळकला आहे.
‘पुढचं पाऊल’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता प्रसाद लिमयेची काल ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये जबरदस्त एन्ट्री झाली आहे. किशोर जहागीरदारच्या भूमिकेत प्रसाद पाहायला मिळाला. कालच्या भागात सुरेश साळुंखे एजेचं लग्न कोणाबरोबर होतंय हे किशोरला सांगताना दिसला. त्यामुळे आता किशोरला एजेचा लग्नाचं आमंत्रण मिळणार का? आणि किशोर एजेच्या लग्नात साळुंखेबरोबर काही कारस्थान रचणार का? तसंच किशोर आणि एजेमध्ये नेमका काय वाद आहेत? किशोर जहागीरदार कुटुंबापासून दूर का राहतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तर येत्या भागात समोर येणार आहेत.
दरम्यान, अभिनेता प्रसाद लिमयेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘पुढचं पाऊल’नंतर तो बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकला. ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत तो पाहायला मिळाला. तसंच ‘बेधडक’, ‘What’s up लग्न’, ‘मोगरा फुलला’, ‘फतेशिकस्त’ या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे. ‘फतेशिकस्त’ चित्रपटात प्रसादने बाळाजी देशपांडेंची भूमिका साकारली होती.