‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartvya Aahe) या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. वेगळ्या धाटणीच्या कथानकामुळे या मालिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसते. वसुंधराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आकाश सर्वांचे मन जिंकून घेतो. तर दुसरीकडे सासूच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी वसुंधरा सतत प्रयत्न करताना दिसते. या मालिकेत आकाश हे पात्र अभिनेता अक्षय म्हात्रेने साकारले आहे, तर वसुंधरा हे पात्र अक्षया हिंदळकर(Akshaya Hindalkar)ने साकारले आहे. आता एका मुलाखतीत अभिनेत्री अक्षया हिंदळकरने तिच्या अपघाताविषयी वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाली अभिनेत्री?

अक्षया हिंदळकरने नुकतीच कलाकट्टाला मुलाखत दिली. या मुलाखतीत अक्षयाला तिच्या अपघाताविषयी विचारण्यात आले. यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “मी याआधी एक मराठी मालिका केली, त्यानंतर मी हिंदीसाठी खूप प्रयत्न केले. खूप ऑडिशन दिल्या. त्यानंतर मी एक हिंदी ऑडिशन क्रॅक केली, त्यामध्ये मी फायनल झाले. त्यानंतर माझं असं झालं की मी मराठी मुलगी हिंदी करणार होते, तर तो आनंदच वेगळा होता. घरीसुद्धा सगळे खूश झाले. आमच्या मालिकेचा मुहूर्त होता, त्या दिवशी मी साडी नेसणार होते. त्याच्या दोन-तीन दिवसांआधी मी ब्लाऊज शिवायला दिला होता. तो आणण्यासाठी मुहूर्ताच्या आदल्या दिवशी मी स्कूटीवरून गेले. जो मोठा सिग्नल असतो, तिथे एक काका सिग्नल हिरवा झाल्यानंतर रस्ता ओलांडत होते, त्यावेळी मी स्पीडमध्ये होते. त्यांना वाचवायला गेले व माझा अपघात झाला. त्यानंतर ती मालिका माझ्या हातातून गेली.

“मी दीड वर्ष चालू शकत नव्हते. डॉक्टरसुद्धा म्हणाले की तिला चालायला वेळ लागेल. त्यानंतर मी नैराश्यात गेले, कारण काम गेलं होतं. त्यादरम्यान खूप गोष्टी कळल्या. स्वत:बद्दल, आपल्या माणसांबद्दल अनेक गोष्टी समजल्या. मला वाटतं की त्या अपघाताने मला खूप शिकवलं. आताची जी मी आहे, ती खूप वेगळी आहे. खूप सकारात्मक, खूप आनंदात आहे. जसं मी कायम म्हणते की मी खूप सुखात आहे. कारण मला वाटतं की या जगातील कुठलीही गोष्ट असू दे, जे चांगलं होणार आहे, तेही जाणार आहे आणि जे वाईट आलंय आयुष्यात, तेही एक दिवस जाणार आहे. अशा विचारांनी आयुष्य जगतेय. मी आशा करते की, मी जे या वर्षभरात शिकलेय तेच कायम ठेवेन आणि कायम सुखात राहीन”, असे म्हणत अक्षयाने तिच्या अपघातानंतर त्यातून ती काय शिकली, याबद्दल भावना व्यक्त केल्या.”

तिच्या अपघाताबद्दल अधिक बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “मी चालू शकत नव्हते, बेडरेस्ट होती. वर्ष-दीड वर्ष चालू शकत नव्हते. आई-वडिलांचा खूप पाठिंबा मिळाला. मला वाटतं की आई-वडील जे आपल्यासाठी करतात, ते जगातील इतर कुठलीच व्यक्ती करू शकत नाही. कुठल्याही नात्यापेक्षा आई-वडिलांचं नातं वेगळं असतं, कारण त्यांना बदल्यात काहीच नको असतं. आधी जेव्हा काम करायचे, खूप बिझी असायचे, तेव्हा आईचा फोन आला तर तिला नंतर करते असं सांगायचे. पण, आता मी कितीही बिझी असले तरी शॉट जरी चालू असेल तर काळजी नको करू, मी ठीकेय असं मी सांगते. आता १०० फोन जरी आले तरी मी १०० व्या फोनला तितक्याच प्रेमाने उत्तर देते आणि आता मालिकेत मी आईचे पात्र साकारत आहे, त्यामुळे मला आता कळतंय की आपल्या आईला किती काळजी असते. पण, अपघाताने खूप गोष्टी कळल्या. माझ्या बाबांनी माझ्यासाठी खूप केलं. वॉशरूमला वगैरे जाताना माझी आई मला उचलून घेऊन जात शकत नव्हती, तर माझे बाबा घेऊन जायचे. हे सगळं माझ्या कायम लक्षात राहील. माझ्या जवळच्या काही मित्र-मैत्रिणींनी मला खूप पाठिंबा दिला”, असे म्हणत अक्षयाने तिच्या आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

हेही वाचा: हंसिका मोटवानीसह तिच्या आई अन् भावाविरोधात अभिनेत्री वहिनीची पोलीस तक्रार, तीन वर्षांपूर्वी झालंय लग्न

‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत सध्या वसुंधरा तिच्या सासूचे मन जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसतेय. तनया व तिच्यामध्ये सतत कुरबुरी चालू असलेल्या दिसतात. आईच्या इच्छेनुसार आकाशने अखिलकडे जबाबदारी सोपवली आहे, तो ती जबाबदारी आकाशशिवाय पार पाडू शकणार का? तनयाचा खरा चेहरा त्याच्यासमोर येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punha kartvya aahe fame akshaya hindalkar reveals about her accident says work gone also shares that incident change her perspective of life nsp