टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या आयुष्यातील महत्त्वाचे स्थान असते. मालिकेच्या पुढच्या भागात काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसते. आता झी मराठी वाहिनीने पुन्हा कर्तव्य आहे(Punha Kartvya Aahe), या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
झी मराठी वाहिनीने, ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये वसुंधरा आणि आकाशमध्ये गैरसमज निर्माण होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
आकाश आणि वसुंधरामध्ये होणार गैरसमज
प्रोमोच्या सुरुवातीला, वसुंधरा आणि आकाश एका गार्डनमध्ये गेल्याचे पाहायला मिळते. वसुंधरा आकाशला म्हणते, “मी तुमच्यापासून एक महत्त्वाची गोष्ट लपवली आहे.” त्यावर आकाश म्हणतो, “हे सगळं ऐकायचंय म्हणूनच आपण इथे आलो आहोत.” दुसऱ्या दृश्यात आकाशची आई टीव्हीवर हे काय दाखवत आहेत? असे म्हणताना दिसत आहे. त्यानंतर त्याचा मोठा भाऊ त्याला फोन करतो. आकाश आणि वसुंधरा घरी येतात. त्यावेळी आकाशच्या लहान भावाची गर्लफ्रेंड सगळ्यांना सांगते, आमचं फक्त एकमेकांवर प्रेम नाही तर आम्ही एकमेकांबरोबर लग्नदेखील केले आहे आणि याची साक्षीदार वसू वहिनी आहे. त्यानंतर आकाश वसुंधराला म्हणतो, “जर तुम्ही एवढी मोठी गोष्ट लपवू शकता, तर माहीत नाही अजून माझ्यापासून काय काय लपवले आहे.”
प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “आकाश आणि वसूमध्ये पडणार गैरसमजाची ठिणगी…!” अशी कॅप्शन दिली आहे.
हेही वाचा: दोन दिवसांत अभिजीत सावंत बदलला…; मित्रमंडळींचा मोठा आरोप! निक्कीशी मैत्री पडली भारी, नेमकं काय घडलं?
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, वसुंधरा आणि आकाश यांचे दुसरे लग्न असून त्यांनी त्यांच्या मुलांसाठी एकमेकांबरोबर लग्न केले आहे. वसुंधराला बनी नावाचा मुलगा आहे, तर आकाशला चिनू-मनू नावाच्या दोन मुली आहेत. मात्र चिनू-मनू बनीला आपला भाऊ मानत नसतात. मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्यामध्ये भावुक दृश्य दाखविले होते. सोशल मीडियावर या सीनची मोठी चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. याबरोबरच, वसुंधरा आणि आकाश यांच्यातील नातेदेखील नवे वळण घेत असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता दाखविलेल्या प्रोमोनंतर मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, आता शेअर केलेल्या प्रोमोनंतर मालिकेत कोणता नवीन ट्विस्ट येणार, आकाश आणि वसुंधरा यांच्यातील नाते बदलणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.