‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून आकाश व वसुंधराच्या नात्यात सतत चढ-उतार आल्याचे पाहायला मिळत होते. वसुंधराचा पहिला पती शार्दुलने तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. आकाशल मारण्याचा प्लॅन वसुंधरानेच केला, असेही आकाशच्या घरच्यांना पटवून दिले. त्याच्या घरच्यांचे मन जिंकले. त्यामुळे आकाशचे कुटुंबिय वसुंधराच्या विरोधात असल्याचे दिसत होते. आता मात्र, मालिकेत ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार
झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरूवातीलाच पाहायला मिळते आकाशच्या घरात सेलीब्रेशन चालू आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी असे लिहले असून संपूर्ण घरात सजावट केल्याचे दिसत आहे. वसुंधरा तिच्या सासऱ्यांना विचारते की बाबा आई कुठे आहेत? त्यावर तिचे सासरे तिला सांगतात, “आईची तब्येत ठीक नाहीये, आपण आधी केक कापून घेऊयात. वसुंधरा त्यांना म्हणते, नाही बाबा. मी आले एक मिनिटात. त्यानंतर ती तिच्या सासूच्या जयश्रीच्या खोलीत जाते. जयश्री अंधार करून बसली असल्याचे दिसत आहे. वसुंधरा खोलीतील लाइट लावते व तिला विचारते, “आई काय झालंय?” जयश्री म्हणते, “मला बरं वाटत नाहीये, तुम्ही आटपून घ्या” त्यावर जयश्री तिला समजावत म्हणते, तुम्ही नाही तर मजाच नाही.चला बरं तुम्हाला यावच लागेल.” जयश्री तिला रागाने म्हणते, “एकदा सांगितलं ना, माझा मूड नाहीये म्हणून.” त्यानंतर संपूर्ण कुटुंब केकसह तिच्या खोलीत आलेले दिसते. वसुंधरा तिला म्हणते, आई तुम्ही कितीही काही म्हणालात ना, तरी तुमच्याशिवाय घरातील सेलीब्रेशनला काहीच अर्थ नाही. त्यानंतर वसुंधरा व आकाश जयश्रीला घेऊन केक कापताना दिसत आहेत. वसुंधरा जयश्रीला म्हणते, तुम्ही कितीही दूर ठेवायचा प्रयत्न केला तरी मी एक ना एक दिवस तुमचं मन जिंकेन, मला खात्री आहे. त्यानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र येत सेल्फी काढताना दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “वसुंधरा जिंकू शकेल का सासूचं मन ?”, अशी कॅप्शन दिली आहे.
पुन्हा कर्तव्य आहे मालिकेत दाखविल्याप्रमाणे, वसुंधराने तिचा पहिला नवरा शार्दुल जिवंत असल्याचे सत्य आकाश व त्याच्या कुटुंबाला सांगितले नव्हते. मात्र, अचानक शार्दुल लकी हे नाव बदलून तिच्या आयुष्यात आला. वसुंधराशी वाईट वागणाऱ्या आणि स्वत:च्या आई-वडिलांना अतोनात छळणाऱ्या शार्दुलने वसुंधराच्या सासरच्या कुटुंबीयांची मने जिंकून घेतली. आकाशची आई त्याला तिचा चौथा मुलगा मानते. काही दिवसांपूर्वी लकी ऊर्फ शार्दुल हाच वसुंधराचा पहिला पती असून, तो जिवंत असल्याचे आकाश व तिच्या कुटुंबाला समजते. त्यानंतर सर्व जण वसुंधराचा द्वेष करतात. आकाशलादेखील वसुंधराबाबत गैरसमज निर्माण होतो.
आता वसुंधरा तिच्या सासूचे मन जिंकण्यासाठी काय करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.