‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartvya Aahe) मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. वसुंधरा व आकाशच्या कुटुंबीयांमधील सर्व गैरसमज दूर झाल्याचे पाहायला मिळत आहे. आकाश व वसुंधरा यांनी नव्याने त्यांच्या संसाराला सुरुवात केली आहे. मात्र, तरीही आकाशच्या आईच्या वसुंधराबद्दल अजूनही तक्रारी आहेत. जयश्रीच्या मनातील वसुंधराबद्दलचे गैरसमज अजूनही दूर झालेले नाहीत. तिला तिच्याबद्दल विश्वास वाटत नाही. आता जयश्रीच्या हट्टासाठी आकाश मोठे पाऊल उचलणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
वसुंधराच्या हक्कासाठी आकाश उचलणार मोठे पाऊल
‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेचा एक प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, जयश्री आकाशला रडत रडत म्हणते, “तू आपली संपत्ती व आपली कंपनी अखिलच्या नावावर कर. जोपर्यंत तू हो म्हणत नाहीस, तोपर्यंत मी काही खाणार-पिणार नाही.” त्यानंतर आकाश विचार करत बसलेला दिसतो. तिथे वसुंधरा येते. आकाश वसुंधराला जयश्रीने घातलेली अट सांगतो. वसुंधरा त्याला म्हणते, “हे तुम्हाला मान्य आहे?”, आकाश तिला समजावत सांगतो की, मी हे केल्याने जर तुम्हाला तुमचा हक्काचा मान मिळणार असेल, तर माझी काहीच हरकत नाही.” प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, आकाशचे कुटुंब एकत्र बसले आहे. आकाश सर्वांना सांगतो, “मी आईच्या मनासारखं करायचं ठरवलं आहे. मी माझी सीईओ पोस्ट सोडून देईन.”, आकाशचे हे बोलणे ऐकल्यानंतर जयश्रीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे; तर वसुंधराला वाईट वाटत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मालिकेच्या या प्रोमोला, “आकाश वसुंधराला घरात तिचा मान मिळावा म्हणून आईची ही इच्छा पूर्ण करणार..”, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
पुन्हा कर्तव्य आहे मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “पुढे जर कंपनीत काही समस्या आली, तर त्याला आकाशच सामोरा जाणार आहे; अखिल नाही.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “हे सगळे तनयाने तिच्या मनात भरवले आहे. जयश्रीला पुढे पश्चात्ताप होणार आहे.”
हेही वाचा: “…तर माझं वजन ७० किलो असतं”, ५१ किलो वजन असलेली प्राजक्ता माळी म्हणाली, “मी कमी बेशिस्त…”
आता मालिकेत पुढे काय होणार, आकाशच्या या कृतीनंतर तरी वसुंधराला घरात मान मिळणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.