‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartvya Aahe) या मालिकेत सतत काही ना काही नवीन घडताना दिसते. कधी वसुंधरा व आकाश यांच्यातील प्रेम पाहायला मिळते; तर कधी दोघे मिळून एकत्र संकटांचा सामना करताना दिसतात. काही दिवसांपासून आकाश ठामपणे त्याच्या पत्नीच्या पाठीशी उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. आकाशच्या आईला वसुंधरा आवडत नसल्याने ती तिच्याशी वाईट वागते. त्याबरोबरच वसुंधरावर अविश्वास असल्याने तिने आकाशलासुद्धा संपत्ती व सीईओचे पद अखिलच्या नावावर करण्यास सांगितले होते. वसुंधराला घरात मान मिळावा, जयश्रीने तिच्याशी नीट वागावे यासाठी आकाश हेसुद्धा करायला तयार होतो. अखिलची पत्नी तनया जयश्रीला वसुंधराविषयी वाईट गोष्टी सांगताना दिसते. त्यामुळे जयश्रीच्या मनात वसुंधराविषयी राग आहे. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये वसुंधरा तनयाला कानाखाली मारणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, तनया तिच्या मैत्रिणींबरोबर पार्टी करीत आहे. तिने दारू प्यायली असून, ती नशेत आहे. नशेतच ती वसुंधराला, “ए वसुंधरा”, अशी हाक मारते. वसुंधरा तिला स्वत:ला सांभाळण्याचा सल्ला देते. त्यावर तनया तिला गप्प बस, असे उद्धटपणे सांगते आणि म्हणते, “मी सीईओची बायको आहे. तू नोकर आहेस. पैशासाठी लग्न केलंस ना तू ?”, तिचे हे बोलणे ऐकूण वसुंधरा तिला समजावत सांगते, “शांत हो तनया”, तनया पुन्हा म्हणते, “नोकर म्हणून उभं राहण्याचीसुद्धा लायकी नाहीये”, हे ऐकताच वसुंधरा तिच्या चेहऱ्यावर ग्लास ओतते. तनया, मी तुला मारेन, असे म्हणत वसुंधराकडे जाते. तर, वसुंधरा जोरात तिच्या कानाखाली मारताना दिसत आहे.
पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “वसुंधराकडून तनयाला मिळणार एक खणखणीत उत्तर…!”, अशी कॅप्शन दिली आहे.
काय म्हणाले नेटकरी?
मालिकेचा हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी वसुंधराचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने, “आता खरी वसुंधरा शोभतेस”, असे लिहीत हार्ट इमोजी शेअर केली आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “आता अशीच राहा. रडणे बंद. सगळ्यांना त्यांची जागा दाखव आणि लाइनवर आण”, असे लिहीत वसुंधराला असेच धाडसाने वागण्याचा सल्ला दिला आहे. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “मस्त वसुंधरा.”
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, तनया व तिची आई वसुंधराविरुद्ध सतत काही ना काही कटकारस्थान करीत असतात. तनया तिच्या आईच्या सांगण्याप्रमाणे जयश्रीच्या मनात वसुंधराविषयी गैरसमज निर्माण करते. त्यामुळे जयश्रीला वसुंधराची कोणतीही गोष्ट आवडत नाही. वसुंधरा मात्र जयश्रीचे मन जिंकण्यासाठी सातत्याने प्रयत्न करते.
आता तनया वसुंधराच्या या कृतीचा बदला घेणार का, वसुंधराविषयी घरच्यांच्या मनात पुन्हा गैरसमज निर्माण होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.