मनोरंजक मालिका आता प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनातही महत्त्वाचा भाग बनू लागल्या आहेत. त्यामुळे मालिकेत घडणाऱ्या गोष्टींचा प्रेक्षकांवर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळते. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षक त्यांची मतेही मांडताना दिसतात. कधी आवडत असणाऱ्या मालिकांचे कौतुक करताना दिसतात; तर कधी ज्या गोष्टी आवडत नाहीत, त्यावर नाराजीही व्यक्त करताना दिसतात. आता एका मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झी मराठी वाहिनीने ‘पुन्हा कर्तव्य आहे'(Punha Kartvya Aahe) या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, आकाश बरा झाला असून, तो वसुंधराच्या घरी येतो आणि तिला काही प्रश्न विचारतो. आकाश वसुंधराला विचारतो, “लकी तुमचा नवरा होता का?” वसुंधरा म्हणते, “हो.” आकाश पुढे तिला विचारतो, “तुमचे सासू-सासरे खोटे बोलले हे तुम्हाला लग्नाआधी माहित होतं का?” वसुंधरा या प्रश्नाचं माहीत होतं, असं उत्तर देते. आकाश शेवटी विचारतो, “पोलिसांत देऊ नये म्हणून तुम्ही घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या का, हा प्रश्न विचारल्यानंतर वसुंधराला आकाशच्या आईनं घेतलेलं वचन आठवतं. ते असं की, आकाश जिवंत राहायला हवा असेल, तर त्याच्यापासून लांब राहा. वसुंधरा आकाशला म्हणते की, सगळं खरंय. हे ऐकल्यानंतर आकाश तिला म्हणतो, “आपलं नातं संपलं.” त्यांचा हा संवाद सुरू असताना वसुंधराचा पहिला नवरा लकी ऊर्फ शार्दुल आणि त्याचे आई-वडीलसुद्धा तिथे दिसत आहेत.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “गैरसमज वाढणार, आकाश व वसू वेगळे होणार…?”, अशी कॅप्शन दिली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत. काही प्रेक्षकांनी त्यांच्या कमेंट्समधून नाराजी व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं, “कुठल्या निगेटिव्ह ट्रॅकवर चालली आहे ही मालिका? एक वेगळा विषय म्हणून बघायला सुरुवात केली होती की, सासू-सासरे सुनेचं लग्न लावून तिच्या आणि नातवाच्या नवीन आयुष्याची सुरुवात करून देतात. मालिकेचे प्रोमोसुद्धा छान होते. आकाशची आई त्याला पुनर्विवाहाचा सल्ला देते आणि सून घरी आल्यावर अशी का वागते? अपेक्षित होतं की, असं काहीतरी दाखवतील की दोघांचं दुसरं लग्न होतं तेव्हा ते नवीन जीवनाशी, नवीन नात्याशी कसे जुळवून घेतात, कसे एकमेकांना समजून घेतात. मुलं एकमेकांशी कशी अॅडजस्ट होतात आणि घरचे त्यांचं नवीन नातं फुलायला कशी मदत करतात. पण इथे सगळंच निगेटिव्ह दाखवत आहेत. वसुंधरा लग्नाआधीच सुखी होती, असं चित्र उभं राहत आहे. पुनर्विवाहाची वेळ कोणावर येऊच नये. पण, आली तर यातून काय पॉझिटिव्ह मेसेज ही मालिका देते? काहीच नाही. सर्व कलाकार छान काम करीत आहेत. त्यांना दिलेली भूमिका ते उत्तमरीत्या सादर करीत आहेत. आकाश व वसुंधरा यांची जोडी ही छान दिसते. लेखकानं मात्र कथेवर चांगलं काम करण्याची गरज आहे.”

आणखी एका नेटकऱ्यानं झी मराठी वाहिनीला टॅग करीत लिहिलं की, काही उरलेली अपेक्षा होती तीसुद्धा भंग झाली; पण का? का तुम्ही स्वतःच असे ट्रॅक आणता, ज्याने मालिका बघणारे कमी होतील. या मालिकेत नकारात्मक व अतार्किक गोष्टी भरून ठेवल्या आहेत. तुला शिकवीन चांगलाच धडा, पारू, सावळ्याची जणू सावली या सर्व मालिका फक्त आणि फक्त चुकीचेच दाखवीत आहेत. याच नेटकऱ्याने त्याच्या कमेंटमध्ये पुढे असेही म्हटले की, काय काळ होता जेव्हा का रे दुरावा, दिल दोस्ती दुनियादारी, काही दिया परदेस, माझा होशील ना, तुझ्यात जीव रंगल इत्यादी मालिकांमध्ये एक धमक होती. या सर्वच मालिका कुठे ना कुठे रिमेक, डब झाल्यात. पण आता नको ते रिमेक घेऊन, तुम्ही फक्त तुमचा प्रेक्षकवर्ग दूर करत आहात. अजूनही वेळ गेलेली नाही. सुधारणा करा आणि जरा प्रेक्षकांना आवडेल असं दाखवत जा. कृपया तुम्ही जसे आधी होतात, तसेच राहा. उगाच कोणाला कॉपी करू नका. आम्हाला ‘झी मराठी’चा जुना पॅटर्न परत हवा आहे. इतर अनेक नेटकऱ्यांनी अशाच आशयाच्या कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: मराठमोळ्या छाया कदम यांच्या चित्रपटाचा पुन्हा एकदा जागतिक पातळीवर सन्मान; मिळाला ‘हा’ प्रतिष्ठित पुरस्कार

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, बनीला वाचवण्यासाठी गेल्यानंतर आकाशला गोळी लागली होती. आकाश व वसुंधरामध्ये शार्दुलमुळे गैरसमज निर्माण झाले आहेत. आकाश बरा झाला असून, त्याच्यात व वसुंधराच्या नात्यात दुरावा आल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punha kartvya ahe aakash and vasundharas broke relation audience get upset with track netizens reacts watch promo nsp