‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartvya Aahe) ही मालिका सध्या नवीन वळण घेताना दिसत आहे. मालिकेत येणाऱ्या सततच्या ट्विस्टमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता वाढताना दिसते. वसुंधरा व आकाश या दोघांचेही दुसरे लग्न असले तरी त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळते. याबरोबरच, बनी हा आकाशचा मुलगा नसूनही तो त्याच्यासाठी ज्या पद्धतीने वेळोवेळी गोष्टी करत असतो, त्याला वडिलांचे प्रेम देत असतो, तेही प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. मात्र, वसुंधराचा पहिला नवरा जिवंत असूनही त्याचे निधन झालेले आहे, असे आकाशला व त्याच्या कुटुंबाला वसुंधराच्या कुटुंबाकडून त्यांच्या लग्नावेळी सांगण्यात आले होते. हे सत्य काही दिवसांपूर्वीच आकाशला समजले आहे, त्यामुळे आकाश व वसुंधरा यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. या सगळ्यात बनीला वाचवण्यासाठी गेल्यानंतर आकाशला गोळी लागली होती. तो तिथून बरा होऊन येईपर्यंत त्याच्या आईने वसुंधराला घराबाहेर जाण्यास सांगितले.
आकाश घरी आल्यानंतरदेखील तिने त्याला वसुंधराबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या, त्यामुळे वसुंधरा व आकाशमध्ये मोठा गैरसमज निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, आकाश वसुंधराच्या घरी आला आहे, मात्र त्याने भरपूर दारू प्यायल्याचे दिसत आहे. त्याला त्याचा तोल सांभाळता येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. वसुंधरा त्याला सांभाळते. आकाश तिला विचारतो, “का केलंस असं? माझ्याबद्दल थोडंसदेखील काही वाटलं नाही?” वसुंधरा म्हणते, “माझं खरंच खूप प्रेम आहे”, आकाश तिला म्हणतो, “तू काय प्रेम करणार? प्रेम तर मी केलंय तुझ्यावर. जीव लावला होता. माझा जीव घेतला आणि चुरा चुरा करून टाकला, तुला कधी माफ करणार नाही”, असे म्हणत आकाश तिथेच खाली कोसळतो.”
‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेचा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “वसुंधराचं प्रेम आकाशच्या मनातील रागावर मात करेल का ?” अशी कॅप्शन दिली आहे.
काय म्हणाले नेटकरी?
या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत आकाश व वसुंधरा यांच्यातील ही केमिस्ट्री आवडत असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “त्यांची केमिस्ट्री”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “आकाश व वसु हे एकमेकांसाठी बनले आहेत”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “तुमची जोडी खूप सुंदर आहे, असेच एकमेकांवर प्रेम करा.”
आता आकाश व वसुंधरा यांच्यातील गैरसमज कसे कमी होणार? वसुंधरा बनीला त्याचे खरे वडील कोण हे सांगू शकणार का? वसुंधरा आकाश व त्याच्या कुटुंबीयांचं मन पुन्हा एकदा कसं जिंकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.