अभिनेत्री पूर्वा कौशिक ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. सध्या ती झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘शिवा’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. मात्र सध्या तिने शेअर केलेल्या सोशल मीडियावरील पोस्टने लक्ष वेधले आहे. अभिनेत्री पूर्वा कौशिक(Purva Kaushik)च्या सासूचे निधन झाले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत तिच्या सासूविषयी प्रेम व्यक्त केले आहेत.
काय म्हणाली अभिनेत्री?
अभिनेत्री पूर्वा कौशिकने तिच्या सासूबरोबरचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्या दोघेही आनंदात दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना पूर्वाने ‘रेस्ट इन पीस आई’ असे लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. पुढे तिच्या भावना व्यक्त करीत अभिनेत्रीने लिहिले, “एक नातं जन्मानं, परिस्थितीनं तयार होतं ते रक्ताचं नातं. त्याला आपण नातेवाईक नाव देतो. हे सर्वसामान्य आहेच. पण, एखादं नातं हे आपण नैसर्गिकपणे, समजून-उमजून सांभाळतो, त्या नात्याला काय नाव द्यायचं, हे कधी मुळात मला कळलंच नाही. तसंच आई तुमचं आणि माझं हे नातं आहे.”
“मन खूप भरून आलंय, डोकं जड झालंय. काय बोलावं, काय करावं कळत नाहीये. मग एक जाणवलं की, तुम्ही आता असं काही झालं असतं, तर काय केलं असतं. तर लिहिलं असतं! तर तसंच काहीसं वाटतंय. आई मी आयुष्यात खरंच खूप काही चांगलं केलं असावं की, तुम्ही आई म्हणून माझ्या आयुष्यात आलात. पंचविशीनंतर माझ्या आयुष्याच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तुमच्यासारखी स्त्री पाहिली ,अनुभवली. जी माझी मैत्रीण, आई , सासू ,बहीण सगळं होतं. मी खूप कधी व्यक्त झालेली नाहीये. माणूस अनुभवानं समृद्ध होत जातो, असं म्हणतात . मला माझं माणूसपण जपण्यात तुमचीच साथ होती, आहे आणि आयुष्यभर असेल.”
“आता या क्षणाला कसं, काय, कुठून बोलावं तेही कळत नाहीये. डोळ्यांसमोरून सहा वर्षांचा काळ एकदम एखाद्या एक्स्प्रेससारखा जातोय. मन खूप जास्त जड झाल्यासारखं वाटतंय; पण तुम्ही जिथे कुठे आहात, तिथे एकदम छान, शांत, मनमोकळेपणाने राहा. तुमच्या आवडीचे बटाट्याचे चिप्स खा. अमुलचं आइस्क्रीम खा. आता अडवायला येणार नाही. हे खा, ते खाऊ नका, असं म्हणणार नाही. मी तुमच्या माझ्याबरोबरच्या आठवणी कायम माझ्यासोबत ठेवणार आहे. माणूस म्हणून प्रवास सुरूच राहणार आहे. कळत-नकळत तुमच्यासारखी होण्याचा, असण्याचा प्रयत्न होत असतो, तो आयुष्यभर करत राहणार आहे. माझ्याबरोबर राहा बस, एवढंच. तुमची पूर्वा “, असे म्हणत पूर्वाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.