‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पारू’मध्ये दिशाची म्हणजे अभिनेत्री पूर्वा शिंदेची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळाली. ५ आलिशान गाड्या, ११ बॉडीगार्ड्स आणि वेस्टर्न लूकमध्ये दिशाची मालिकेत एन्ट्री झाली. पण, ‘पारू’ मालिकेच्या सेटवर एकेदिवशी पूर्वा शिंदे आणि प्रसाद जवादेचं कडाक्याचं भांडण झालं होतं, हे तुम्हाला माहितीये का? नुकत्याच एका मुलाखतीमध्ये पूर्वाने प्रसादबरोबर झालेल्या भांडणाबाबत सांगितलं.
अभिनेत्री पूर्वा शिंदेने ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना भांडणाचा किस्सा सांगितला. पूर्वा म्हणाली, “प्रसाद आणि माझं कधीचं पटणार नाही, असं मला खूप वाटतं होतं. कारण तो सुरुवातीला खूप कुचकटसारखा वागायचा. आताही कधी, कधी वागतो. पण, तो आता जास्त प्रेमळ झालाय. तर मला सेल्फी काढायची खूप सवय आहे. आरशासमोर उभं राहून सेल्फी, स्नॅप, बीटीएस याची मला सवय आहे. मला आठवणी मोबाइलमध्ये कॅप्चर करून माझ्याबरोबर ठेवायला खूप आवडतात.”
पुढे पूर्वा शिंदे म्हणाली, “मी असाच एकदा स्नॅप घेत होते. तेव्हा प्रसाद माझ्या मागे होता. तर तो क्राउडमधल्या लोकांना म्हणाला, स्नॅप घेऊ नका. मला असं झालं की, मी तुझे स्नॅप घेतच नाहीये. मग मला म्हणाला की, मी तुला बोललोच नाहीये. त्यानंतर मी बोलले, मलाच बोललास, मला कळतं. अशी आमची खूप बाचाबाची झाली. आजूबाजूला असलेल्या क्राउडसमोर आम्ही दोघं भांडत होतो. यावरून मुग्धा कर्णिक म्हणजे अहिल्यादेवी माझ्यावर ओरडली.”
“त्यानंतर ताई आणि माझं भांडण झालं. मी म्हणाले, अगं तू मला का गप्प करतेय? मी लहान आहे म्हणून तू मला गप्प करतेय. असं भरपूर झालं. मग मी थोडे दिवस ताईबरोबर बोलत नव्हते, रुसून बसले होते. पण नंतर मला मुद्दा कळला की, बाहेरच्या लोकांसमोर भांडण नव्हतं करायला पाहिजे. प्रसाद आणि मी बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींवर भांडतो. पण, तो खूप चांगल्या मनाचा आहे. त्यामुळे नंतर सगळं व्यवस्थित होतं,” असं पूर्वा शिंदे म्हणाली.
दरम्यान, पूर्वा शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘पारू’ मालिकेआधी ‘लागिरं झालं जी’, ‘तुझं माझं जमतंय’, ‘जीव माझा गुंतला’, ‘टोटल हुबलाक’ यांसारख्या मालिकेत झळकली होती. तसंच तिने ‘युवा डान्सिंग क्वीन’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या दोन लोकप्रिय कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.