Pushpa 2 Peelings Song : सध्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्याचं पाहायला मिळालं. या चित्रपटातलं ‘पीलिंग्स’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या गाण्याची भुरळ आता नेटकऱ्यांना सुद्धा पडली आहे. सामान्य लोकांपासून ते मराठी कलाविश्वातील कलाकार सगळेजण या ‘पीलिंग्स’ गाण्यावर डान्स करत असल्याचे व्हिडीओ शेअर करत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सीझनमुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या दोन मराठी अभिनेत्री सुद्धा नुकत्याच या व्हायरल गाण्यावर थिरकल्या आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वामुळे सोनाली पाटील आणि मीनल शाह यांच्यात घट्ट मैत्री झाली होती. या दोघींना हा सीझन सुरू असताना सोना-मोनाची जोडी असं म्हटलं जायचं. या दोघींची मैत्री शो संपल्यावर सुद्धा कायम राहिली आहे. यांच्या कामाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं, तर सोनाली पाटीलने ‘वैजू नं. १’ मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. तर, ‘रोडीज’सारखा शो केल्यावर अभिनेत्री मीनल शाहने ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात एन्ट्री घेतली होती. आता ‘बिग बॉस’चा तिसरा सीझन संपून जवळपास ३ वर्षे उलटूनही यांची मैत्री अगदी आधीसारखीच घट्ट आहे. नुकत्याच या दोन मैत्रिणी ‘पुष्पा २’ चित्रपटातील गाण्यावर थिरकल्या आहेत.
सोनाली आणि मीनल यांच्या डान्सवर कमेंट्सचा वर्षाव
‘पीलिंग्स’ हे गाणं ‘पुष्पा २’मध्ये पुष्पा-श्रीवल्ली यांच्यावर चित्रित झालेलं आहे. अल्लू अर्जुन आणि श्रीवल्लीने या गाण्यावर जबरदस्त एनर्जीने डान्स केला आहे. अगदी त्याचप्रमाणे सोनाली व मीनलने देखील संपूर्ण एनर्जीसह ‘पीलिंग्स’ गाण्यावर ठेका धरला आहे. हा व्हिडीओ सोनालीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “फ्लावर समझा क्या हम वाइल्ड फायर हैं” असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे.
सोनाली आणि मीनलचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “अनेक दिवसांनी सोना-मोनाची जोडी पाहायला मिळाली”, “सोना-मोना खूप प्रेम”, “तुमचा डान्स अल्ट्रा प्रो वाइल्ड फायर आहे”, “नुसती आग” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, ‘पुष्पा २’बद्दल सांगायचं झालं, तर चित्रपटाने आतापर्यंत भारतात ८२२.२० कोटींची कमाई केली आहे तर, जगभरात आतापर्यंत या चित्रपटाने ११०० कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे.