Star Pravah Serial : ‘स्टार प्रवाह’च्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री क्षिती जोगने एन्ट्री घेतली. तिच्या एन्ट्रीची सर्वत्र प्रचंड चर्चा झाली. क्षिती या मालिकेत वकिलाची भूमिका साकारणार आहे. क्षितीबद्दल सर्वत्र चर्चा होत असतानाच आता ‘स्टार प्रवाह’च्या आणखी एका लोकप्रिय मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचा प्रोमो समोर आला आहे.
छोट्या पडद्यावरील मालिका वर्षानुवर्षे सुरू असतात त्यामुळे, कथानकाच्या मागणीनुसार अनेकदा मालिकांमध्ये नव्या पात्रांच्या एन्ट्री केल्या जातात. या कलाकारांच्या एन्ट्रीने मालिका एका नव्या वळणावर जाते. सायली-अर्जुनच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेपाठोपाठ आता राया-मंजिरीच्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झालेली आहे.
‘रानबाजार’ या वेबसीरिजमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री माधुरी पवार आता ‘स्टार प्रवाह’च्या ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत झळकणार आहे. तिच्या जबरदस्त एन्ट्रीचा प्रोमो नुकताच सर्वांसमोर आला आहे. हातात डिझायनर अंगठी- कडा, डोळ्याला हटके गॉगल अशा डॅशिंग लूकमध्ये माधुरीने या मालिकेत एन्ट्री घेतली आहे. या मालिकेत ती निक्की हे पात्र साकारणार आहे.
निक्की- मंजिरीमध्ये वाद होतो आणि शेवटी मंजिरीला त्रास दिल्यामुळे राया निक्कीची गाडी जाळतो असा प्रसंग या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. शुक्रवारी ११ एप्रिल रात्री १० वाजता हा जबरदस्त सीन प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक आता माधुरीच्या एन्ट्रीची आतुरतेने वाट पाहात आहेत.
‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका ‘स्टार प्रवाह वाहिनी’वर रोज रात्री १० वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये मंजिरी हे पात्र पूजा बिरारी तर, राया हे पात्र अभिनेता विशाल निकम साकारत आहे. पूजा आणि विशालसह नीना कुलकर्णी, आतिशा नाईक, संग्राम साळवी अशी तगडी कलाकार मंडळी ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, ‘देवमाणूस’, ‘रानबाजार’ या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत लोकप्रिय झाली. ती उत्तम नृत्यांगणा देखील आहे. सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत काम करताना माधुरीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मेहनतीच्या जोरावर आज अभिनेत्रीने मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.