एका लोकप्रिय अभिनेत्रीने ४ महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न केलं आणि आता ती घटस्फोट घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या अभिनेत्रीच्या कथित पतीने यासंदर्भात अनेक दावे केले आहे. तसेच तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही त्याने केला आहे.
‘रब से है दुआ’, ‘ये जादू है जिन का’ आणि ‘अपोलेना’ यांसारख्या टीव्ही शोमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अदिती शर्माच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. अभिनित कौशिकने दावा केला आहे की अदितीने त्याच्याशी गुपचूप लग्न केलं आणि आता अवघ्या चार महिन्यांनंतर ती घटस्फोट मागत आहे. अभिनितने अदितीचे तिच्या सहकलाकाराबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला आहे.
अभिनीत कौशिकने इंडिया फोरमशी बोलताना सांगितलं की हे लग्न सिक्रेट ठेवायची विनंती अदिती शर्माने त्याला केली होती. “आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि लिव्ह-इनमध्ये राहत होतो. तिच्या जवळच्या लोकांना, सहकलाकारांना आमच्याबद्दल माहीत होतं. मी तिचा मॅनेजर असल्याचं नाटक करत होतो. खरं तर मी तिचे काम, तिच्या मीटिंग्ज, तिचे इन्स्टाग्राम या सगळ्या गोष्टी सांभाळत होतो. आम्ही गेल्या वर्षी एकत्र राहू लागलो आणि नंतर नोव्हेंबरमध्ये लग्न केलं,” असं अभिनीत म्हणाला.
लग्नासाठी दबाव होता – अभिनीत कौशिक
अभिनीत कौशिक पुढे म्हणाला, “ती गेल्या दीड वर्षांपासून माझ्यावर लग्नासाठी दबाव आणत होती आणि मी तिला सांगायचो की मी लग्नासाठी तयार नाही. रिलेशनशिपच्या सुरुवातीला मी लग्नासाठी खूप उत्साही होतो, पण नंतर काही गोष्टींमुळे मी संभ्रमात होतो आणि लग्नासाठी तयार नव्हतो. पण तिने माझ्यावर दीड वर्ष लग्नासाठी दबाव टाकला, त्यानंतर मी होकार दिला. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये आमचे लग्न झाले. तिच्या करिअरमुळे कुणालाही लग्नाबद्दल कळू नये, अशी तिची अट होती.”

“लग्न ही एक कमिटमेंट होती आणि जोडीदार म्हणून तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी सर्वकाही करता, मग ते काहीही असो. तुम्ही त्यांना त्यांच्या करिअरमध्ये आणि प्रत्येक गोष्टीत मदत करण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे तिने जे म्हटलं ते मी मान्य केलं,” असं अभिनीत म्हणाला.
लग्नात दोघांचेही कुटुंबीय उपस्थित होते, असा दावा अभिनीतने केला आहे. “आम्ही तिच्या भावंडांच्या, माझ्या भावंडांच्या, आई-वडिलांच्या उपस्थितीत आमच्या घरी लग्न केलं. लग्नात दोन भटजी होते. लग्न पूर्णपणे विधीनुसार झाले. ३-४ दिवस सगळे कार्यक्रम झाले होते. माझ्याकडे आमच्या लग्नाचे किमान एक हजार फोटो आहेत,” असं अभिनीत कौशिक म्हणाला.
अभिनीत कौशिकने आदिती शर्मावर विवाहबाह्य संबंधांचे आरोपही केले आहेत. अदितीचे ‘अपोलेना’ मालिकेतील तिचा सह-कलाकार सामर्थ्य गुप्ताबरोबर अफेअर आहे, असा दावा अभिनीतने केला आहे. तिला त्याच्याबरोबर रंगेहात पकडल्यानंतर आदितीने लग्न वैध नसल्याचं म्हटलं. तसेच ते लग्न म्हणजे मॉक ट्रायल होते, असंही ती म्हणाल्याचा दावा अभिनीतने केला आहे. अदितीने घटस्फोटाबरोबरच २५ लाख रुपयांची मागणी केल्याचंही अभिनीतने म्हटलं आहे. दरम्यान, अदितीने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.