‘शार्क टॅंक इंडिया’चं पहिलं पर्व खूप गाजलं. त्यानंतर आता ‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनची जबरदस्त चर्चा आहे. या कार्यक्रमात नवीन व्यवसायिक त्यांच्या बिझनेसच्या कल्पना घेऊन जज शार्क्सना सांगतात आणि शार्क्सना जर त्यांच्या व्यवसायात रस वाटलं तर ते त्यांच्या व्यवसायात पैसे गुंतवतात. पण अनेकदा हा शो स्क्रिप्टेड असल्याचं म्हटलं जातं. आता अशातच राहुल दुआचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याने शार्क्सना गुंतवणूक करायची नसेल तर त्यांच्याकडे कारण तयार असतात असं म्हटलं आहे.
राहुल दुवा या शोचं सूत्रसंचालन करत आहे. गेल्याच आठवड्यात या सर्व टीमने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने शार्क्सना एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करायची असेल तर ते कशीही करतात. पण त्यांना एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करायची नसेल तर त्यांच्याकडे चार कारणं नेहमीच तयार असतात असं गमतीत म्हटलं. आता त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
तो म्हणाला, “जर शार्क्सना कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करायची असेल तर ते ती कशीही करतात. आम्हाला तुझा व्यवसाय समजला नाही पण आम्हाला तू आवडलास असं ते म्हणतात. पण जर व्यवसाय चांगला असूनही त्यांना गुंतवणूक करायची नसेल तर त्यांच्याकडे चार कारण नेहमीच तयार असतात. एखादा व्यवसाय बी टू बी म्हणजेच बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू कस्टमर दोन्हीमध्ये असेल तर तुम्ही दोन्हीमध्ये काय करताय? तुमचा फोकस नाहीये असं हे म्हणतात. जर कोणी फक्त बी टू बी किंवा बी टू सीमध्ये असेल तर म्हणतात तुम्हाला दूरदृष्टी नाही.”
त्यामुळे आता सध्या ही क्लिप खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी शार्क टॅंक इंडिया कार्यक्रमाला ट्रोल केलं आहे. त्यामुळे नेटकरी पुन्हा एकदा ‘शार्क टॅंक इंडिया’च्या खरेपणावर संशय येऊ लागले आहेत.