काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम येथे २२ एप्रिलला भयाड हल्ला झाल्याचं समोर आलं. यामध्ये अनेक निष्पाप लोकांनी त्यांचा जीव गमावला. या दुर्दैवी घटनेमध्ये जवळपास २६ पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागला. काश्मीरमध्ये काही दहशतवाद्यांनी पहलगाम येथे आलेल्या या निष्पाप लोकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी घडलेल्या या भयानक घटनेनंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली.
देशभरातून अनेक लोक सोशल मीडियामार्फत स्टोरी, फोटोज पोस्ट करीत दहशतवाद्यांचा निषेध करीत आहेत. अनेक कलाकारांनीही याबाबत पोस्ट केल्याचे पाहायला मिळते. अशातच प्रसिद्ध गायक व ‘बिग बॉस’ फेम राहुल वैद्य यानेदेखील काश्मीरमध्ये घडलेल्या प्रकाराचा निषेध केला आहे.
राहुल त्याची पत्नी अभिनेत्री दिशा परमारसह नुकताच काश्मीर येथील पहलगाममध्ये गेला होता. राहुलने त्याच्या काश्मीर ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत तेथे घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. राहुलने त्याचे व दिशाचे फोटो पोस्ट करीत लिहिले आहे, “ही तीच जागा आहे, जिथे पर्यटकांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. कदाचित आमचाही त्यात जीव गेला असता. मृत झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

त्या घटनेबद्दल बोलताना पुढे राहुलने पहलगाम येथे निष्पाप लोकांचा जीव घेतलेल्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा व्हावी, असे म्हटले आहे. “pakad pakad ke goli maaro.. no humanity for the killers of humanity!” असं म्हणत त्याने दहशतवाद्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.राहुल वैद्यसह मनोरंजन क्षेत्रातील इतर अनेक कलाकारांनीही घडलेल्या घटनेचा निषेध करत काश्मीर येथील पर्यटकांचा जीव घेणाऱ्या क्रूर लोकांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. शाहरुख खान, अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, विकी कौशल, संजय दत्त्, रवीना टंडन, हिना खान यांसारख्या अनेक हिंदी कलाकारांनी देशात घडलेल्या या दुर्दैवी घटनेचा निषेध केला आहे.
दरम्यान, हिंदीसह मराठीतील कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त करीत सोशल मीडियामार्फत राग व्यक्त केला आहे. अभिनेत्री शिवानी रांगोळे, अभिनेता समीर परांजपे, सुव्रत जोशी यांसारख्या अनेक कलाकारांनी याबाबत हळहळ व्यक्त केली आहे.