उत्तर भारतामध्ये ‘करवा चौथ’ हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे वटपोर्णिमा साजरी केली जाते, अगदी त्याचप्रमाणे तेथे करवा चौथ या सणाला महत्त्व आहे. पतीची भरभराट व्हावी, त्याचे आयुष्य वाढावे यासाठी स्त्रिया करवा चौथच्या दिवशी उपवास ठेवतात आणि रात्री चंद्राचे दर्शन घेऊन पतीच्या हाताने गोड पदार्थ खाऊन उपवास सोडतात. गुरुवारी देशभरामध्ये हा सण मोठ्या थाटात साजरा केला गेला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही या उत्सवात सहभागी झाले.
राहुल वैद्य आणि दिशा परमार ही टेलिव्हिजन विश्वातली लोकप्रिय जोडी आहे. ‘बिग बॉस १४’च्या दरम्यान राहुलने तिला प्रपोझ केले होते. २०२१ मध्ये त्यांनी लग्न केले. त्याआधी काही वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. काल दिशाने राहुलसह हा सण साजरा केला. राहुलसाठी तिने दिवसभर उपवास ठेवला होता. त्यांच्या करवा चौथचा व्हिडीओ राहुलने सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा – ‘आदिपुरुष’ चित्रपटामागचे ग्रहण संपेना; हिंदू सेनने उच्च न्यायालयात दाखल केली याचिका
या व्हिडीओमध्ये ते दोघे मिळून उपवास सोडत आहेत असे पाहायला मिळते. दिशाने चंद्राचे दर्शन घेत उपवास सोडला. मग राहुलने तिला पाणी पाजले आणि ताटामध्ये असलेला गोड पदार्थ स्वत:च्या हाताने तिला खाऊ घातला. त्यानंतर दिशाने त्याला मिठी मारत त्याच्या पायांना स्पर्श करत नमस्कार केला. पुढे लगेचच राहुलही तिच्या पाया पडला. राहुलच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोस्ट केलेल्या या व्हिडीओला त्याने “माझी पत्नी आणि तिच्यासारख्या तमाम स्त्रिया ज्या पतीसाठी दिवसभर उपाशी राहतात त्यांना मानाचा दंडवत. ही सर्वात शुद्ध आणि पवित्र भावना आहे ज्याचे वर्णन करणं अशक्य आहे. दिशा तुला खूप प्रेम आणि करवा चौथच्या खूप खूप शुभेच्छा” असे कॅप्शन दिले आहे.