महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देत आहेत. अनेक मराठी कलाकारांनीही राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापनेही राज ठाकरे यांना अनोख्या अंदाजामध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.
पृथ्वीकने राज ठाकरेंबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच त्याने ही स्टोरी राज ठाकरेंना टॅगही केली आहे. हा फोटो २०२२ च्या दिवाळीतील आहे. २०२२ च्या दिवाळीत पृथ्वीकने राज ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. याचे काही फोटो आणि एक पोस्ट त्याने शेअर केली होती.
वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून राज ठाकरेंना मिठाई, पुष्पगुच्छासारख्या असंख्य भेटी येतात. यावरून राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं. वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच त्यांनी कार्यकर्त्यांसाठी एक फेसबूक पोस्ट लिहिली होती. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येण्यास मनाई केली होती. तसेच जर वाटलंच तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य आणा, तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान राखाल ह्याची मला खात्री आहे,” असे राज ठाकरे म्हणाले होते.
दरम्यान, अभिनेता पृथ्वीक प्रताप याने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांत काम केले आहे. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात विनोदी पात्र साकारताना दिसत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ’83’ चित्रपटातही त्याने काम केले होते.