मराठी गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांचा प्रसिद्ध मराठी टॉक शो ‘खुपते तिथे गुप्ते’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल १० वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना अवधूत गुप्तेंचे प्रश्न व शोमधील चाहत्यांची उत्तरं पाहायला मिळणार आहे. या शोचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यानुसार, यामध्ये राज ठाकरे पाहुणे म्हणून दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झी २४ तास’ने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये, अवधूत गुप्ते प्रश्न विचारताना व राज ठाकरे त्याचं उत्तर देताना दिसत आहेत. गुप्ते यांनी राज यांना राजकीय प्रश्न विचारला. हा प्रश्न राज्यात मागच्या चार वर्षांत बदललेल्या दोन मुख्यमंत्र्यांबद्दल होता. “गेल्या चार वर्षांत शिवसेनेच्या दोन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. दोन्हीही मुख्यमंत्री ‘आज बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं’, असं म्हणताना दिसले. पण, तुम्हाला नेमक्या कुठल्या शपथविधीच्या वेळी बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाल्यासारखं वाटलं? उद्धव ठाकरेंच्या की एकनाथ शिंदेंच्या?” असा प्रश्न अवधूत गुप्ते यांनी राज ठाकरेंना विचारला.

“एखाद्या मुस्लीम नेत्याने…”, नसीरुद्दीन शाहांची पंतप्रधान मोदींवर टीका; निवडणूक आयोगालाही सुनावले खडे बोल

या प्रश्नावर उत्तर देत मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले, “कुणाच्याच नाही. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं हे काही बाळासाहेबांचं स्वप्न नव्हतं. महाराष्ट्राला जाग येणं आणि महाराष्ट्र तसाच पूर्वीसारखा बलशाली होणं, हे माझ्यामते बाळासाहेबांचं स्वप्न होतं. हे मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं, त्यांचं स्वप्न नव्हतं,” असं स्पष्ट उत्तर राज ठाकरे यांनी दिलं.

‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम येत्या ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या व्हिडीओनंतर राज ठाकरे या कार्यक्रमाचे पहिले पाहुणे असतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या पूर्ण एपिसोडची उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray on eknath shinde and uddhav thackeray about completing balasaheb dream in khupte tithe gupte hrc