कॉमेडियन राजीव ठाकूर द ग्रेट इंडियन कपिल शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. आता मात्र त्याच्या विनोदांमुळे नाही तर एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे राजीव ठाकूर चर्चेत आला आहे. सुनील ग्रोवर व कपिल शर्मा(Kapil Sharma)च्या वादावरही अभिनेत्याने वक्तव्य केले आहे. याबरोबरच, यश मिळाल्यानंतर कपिल शर्मा अहंकारी झाला, असे अनेकदा म्हटले जाते, यावरही राजीव ठाकूरने मत व्यक्त केले.
राजीव ठाकूर काय म्हणाला?
राजीव ठाकूरने नुकतीच सिद्धार्थ कननच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.या मुलाखतीत त्याला विचारले की कपिलचा कधी हेवा वाटला आहे का? यावर त्याने म्हटले की कधीही नाही. उलट तो ज्याप्रकारे प्रेक्षकांना खिळवून ठेवतो, त्याचे कौतुक वाटते. पुढे कपिलला अनेकजण अहंकारी, उद्धट म्हणतात. त्यावर त्याचे मत काय आहे, असे विचारल्यानंतर राजीव ठाकूरने म्हटले की त्याच्यावर खूप दबाव असतो, लोकांना ते समजत नाही. दोन ते अडीच तासांची स्क्रीप्ट कोण लक्षात ठेवू शकते? त्याने कधी चूक केली आहे का? तो एकदाही बोलताना अडकला नाही. याशिवाय त्याला कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागतही करावे लागते. त्यांच्याशी गप्पा माराव्या लागतात. शो आणखी चांगला होण्यासाठी चॅनेलच्या क्रिएटीव्ह टीमबरोबर बसावे लागते. हा त्याचा अहंकार नाही.
जर मी कपिलइतका प्रसिद्ध व यशस्वी झालो तर ते यश मला सांभाळता येणार नाही. तो ज्याप्रकारे त्याला मिळालेली प्रसिद्धी सांभाळतो, त्याप्रकारे कोणीही सांभाळू शकत नाही. माझ्या स्वत:कडे कपिलच्या ५ टक्केसुद्धा प्रसिद्धी नाहीये. मलाच कधीकधी चाहत्यांमुळे चिडचिड होते. मात्र, कपिल ज्याप्रकारे चाहत्यांना भेटतो, ते तुम्ही पाहायला पाहिजे.
कपिल व सुनील ग्रोवर यांच्या वादाविषयी बोलताना अभिनेत्याने म्हटले की आता त्यांच्यामध्ये कोणतेही वाद किंवा एकमेकांविषयी कटवटपणा नाही. कोणामध्ये भांडण होत नाहीत? जर त्यांचे भांडण इतके गंभीर असते, तर ते आजही एकत्र कसे असतात व एकत्र शूटिंग कसे करतात? पैशामुळे तुम्ही एकत्र काम करू शकता, परंतु जर सेटवरील वातावरण पाहिले तर समजते की ते खरोखर एकमेकांबरोबर असण्याचा आनंद घेतात. शूटिंगनंतरही ते अनेकदा एकत्र बसतात.
दरम्यान, राजीव ठाकूरबद्दल बोलायचे तर अभिनेता हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये तसेच कॉमेडी सर्कस आणि द कपिल शर्मा शो सारख्या टेलिव्हिजन शोमध्ये काम करण्यासाठी ओळखला जातो. याबरोबरच, आयसी ८१४: द कंधार हायजॅकमध्येही महत्वाची भूमिका साकारली होती.