बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक साजिद खान सध्या ‘बिग बॉस १६’ मध्ये दिसत आहे. त्याची या शोमध्ये एंट्री होताच त्याच्यावर ४ वर्षांपूर्वी लावले गेलेले लैंगिक शोषणाचे आरोप पुन्हा चर्चेत आले आहेत. साजिदवर सुमारे १० महिलांनी अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला होता. तो या शोमध्ये सहभागी झाल्यामुळे ‘बिग बॉस’चे निर्माते तसेच होस्ट सलमान खान यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अनेक नामवंत व्यक्तींनी त्याला या शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. साजिद खानवर चहूबाजूंनी टीका होत असताना ड्रामा क्वीन राखी सावंत त्याच्या समर्थनार्थ उभी आहे. साजिद खानची बाजू घेताना राखीने साजिदवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रींबद्दलच काही धक्कादायक विधाने केली आहेत.
आणखी वाचा : ‘डबल एक्सएल’ चित्रपटाचा हटके ट्रेलर प्रदर्शित, सोनाक्षी आणि हुमाच्या बोल्ड संवादांनी वेधलं लक्ष
राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती साजिद खानबाबत मीडिया रिपोर्टर्सशी बोलताना दिसत आहे. ती म्हणते की, “संपूर्ण जग एका बाजूला असले तरी मी एकटी उभी राहून साजिद खानला पाठिंबा देईन. मी त्याच्या बाजूने उभी आहे कारण चार वर्षांपासून त्याच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. या याउलट या वर्षांत त्याची कारकीर्द उद्ध्वस्त झाली आहे. त्याने कोणताही चित्रपट केलेला नाही, तो डिप्रेशनमध्ये आहे. देवाने मला साजिदचे चांगले व्हावे यासाठी बनवले आहे आणि मी त्याच्या समर्थनासाठी उभी राहीन. तसेच त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास मीही चपलेने त्याला चोप देईन, कारण कोणत्याही मुलीवर अन्याय नाही व्हायला पाहिजे.
यानंतर राखीने साजिदवर ज्या अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते त्यांच्याबद्दल भाष्य केलं आहे. राखी म्हणाली, “तुम्ही साजिदवर आरोप केलेल्या सर्व अभिनेत्रींची पार्श्वभूमी तपासा. सोशल मीडियावरील त्यांचे फोटो पहा. सोशल मीडियावर त्यांचे निर्वस्त्र फोटो तुम्हाला दिसतील. चित्रपट मिळवण्यासाठी त्या काहीही करू शकतात.” यापूर्वीही राखी साजिद खानची बाजू घेत त्या “अभिनेत्री हे आरोप पब्लिसिटी मिळवण्यासाठी करत आहेत,” असं बोलली होती.
हेही वाचा : राखी सावंतला बनायचे आहे मुख्यमंत्री, पद मिळाल्यावर सर्वात आधी करणार ‘हे’ काम
दिग्दर्शक साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. FWICE संस्थेने साजिद खानवर बंदी घातली. ‘हिम्मतवाला’ ‘हमशकल्स’ सारखे अपयश दिल्यानंतर, साजिद खान ‘हाऊसफुल ४’मधून पुनरागमन करणार होता. तथापि, अशा आरोपांमुळे साजिदला या चित्रपटातून पायउतार होण्यास सांगण्यात आले आणि साजिद-फरहाद या दिग्दर्शक जोडीने चित्रपटाचा ताबा घेतला.