बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं आहे. राखीने पती आदिल खानवर अनेक गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मंगळवारी (७ फेब्रुवारी) ओशिवरा पोलिसांनी आदिलला अटक करत त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर राखीने हिजाब परिधान करत कोर्टात हजेरी लावली. त्यावेळी राखीने आदिलकडे न्यायलयीन कोठडीत दोन फोन असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
आदिलला अटक केल्यानंतर राखी सावंत ही सातत्याने चर्चेत आहे. तिचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यात ती आदिलबद्दल विविध खुलासे करताना दिसत आहे. नुकतंच राखीने हिजाब घालून कोर्टातही हजेरी लावली. यादरम्यानचा राखीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत राखीची वकील आदिलवर गंभीर आरोप करताना दिसत आहे.
आणखी वाचा : “तो माझा भाऊ…” राखी सावंतविरोधात तक्रार देणाऱ्या अभिनेत्रीचा आदिलला पाठिंबा; म्हणाली “चर्चेत राहण्यासाठी…”
राखीच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार, “आम्हाला आदिलबद्दल एक महत्त्वाची माहिती समजली आहे. आदिल हा जेव्हा पोलीस कोठडीत होता, त्यावेळी त्याच्याकडे दोन आयफोन होते. आता याबद्दल जास्त माहिती हे तपास करणारे अधिकारीच देऊ शकतात.”
“आदिलकडे पोलीस कोठडीत असताना फोन होता आणि त्याद्वारे तो त्याची गर्लफ्रेंड तनुला फोन करायचा, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. पण याबद्दलची खात्री आम्ही देऊ शकत नाही”, असे त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान राखी व आदिलने मे २०२२मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. सात महिन्यांनंतर राखीने तिच्या लग्नाबाबत खुलासा केला होता. अनेक दिवसांच्या ड्राम्यानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं. त्यानंतर काहीच दिवसांनी राखीने आदिलच्या अफेअरबाबत खुलासा केला होता. राखीने कॅमेऱ्यासमोर येत आदिलच्या गर्लफ्रेंडचं नावही जाहीर केलं होतं. याबरोबरच राखीने आदिलवर मारहाण व फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत.