राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी तुरुंगात होता. राखीने त्याच्यावर फसवणूक व मारहाणीचे आरोप केले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. राखीने आरोप केल्यानंतर कर्नाटकमधील म्हैसूर इथेही एका इराणी तरुणीने आदिलवर बलात्काराचा आरोप केला होता. सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतर आदिलला जामीन मिळाला आहे. आता त्याने राखी व इराणी तरुणीने केलेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
“मी त्या इराणी मुलीवर आतापर्यंत ३१ लाख रुपये खर्च केले आहेत. ती माझी मैत्रीण नव्हती, एकेकाळी मला तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता, पण ती माझी गर्लफ्रेंड होती, असं तुम्ही म्हणू शकत नाही. कारण ती माझी गर्लफ्रेंड असती तर माझ्या स्वभावाबद्दल तिला माहीत असतं. मी खूप चांगला आहे आणि मी महिलांचा आदर करतो, त्यामुळे तिला मी कळालो असतो तर तिने माझ्यावर बलात्काराचे आरोप केलेच नसते,” असं आदिल खान पत्रकार परिषदेत म्हणाला.
नेमकं प्रकरण काय?
राखी सावंतचा पती आदिल खानच्या विरोधात फेब्रुवारी महिन्यात म्हैसूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. एका इराणी विद्यार्थिनीने वीवी पुरम पोलीस ठाण्यात कलम ३७६, ४१७, ४२०, ५०४ आणि ५०६ नुसार तक्रार दाखल केली होती. तिने आदिलवर बलात्कार आणि धमकावण्याचे आरोप केले होते. ही इराणी विद्यार्थिनी डॉक्टर ऑफ फार्मसीचं शिक्षण घेण्यासाठी भारतात आली होती. लग्नाचं वचन देत त्याने एका अपार्टमेंटमध्ये तिच्यावर बलात्कार केला. या अपार्टमेंटमध्ये दोघंही एकत्र राहत होते, असंही त्या तरुणीने म्हटलं होतं.